पुणे : सध्या स्वित्झर्लंड येथे असलेला आणि कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आलेला गुंड नीलेश घायवळ याच्या घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या. या प्रकरणी घायवळविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळ याच्या घराची झडती कोथरूड पोलिसांनी शनिवारी (दि. ४) घेतली. शास्त्रीनगर येथील श्री संत ज्ञानेश्वर काॅलनीतील घायवळच्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. त्याच्या घरातील कपाटातून दोन काडतुसे आणि चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या एसीपी भाऊसाहेब पटारे, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नेमाणे करत आहेत.
कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ, तसेच साथीदारांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवत घायवळ स्वित्झर्लंडमध्ये पसार झाला. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे. घायवळने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पासपोर्ट मिळवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पासपोर्ट मिळवताना वापरले आहे. त्याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
घायवळ, तसेच त्याच्या कुटुंबीयांचे आर्थिक स्रोत पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घायवळ, त्याच्या कुटुंबीयांची दहा बँक खाती गोठवण्याबाबत पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर बँकेकडून नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती नीलेश घायवळ, कुसुम घायवळ आणि पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठवण्यात आली आहेत. दहा बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये आढळून आले असून, पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या बँक खात्यातून घायवळ कुटुंबियांना कोणताही व्यवहार करता येणार नाही.
पोलिसांनी निलेश घायवळ याच्या शास्त्रीनगर, कोथरूड येथील घर तसेच कार्यालयाची झडती घेतली. यावेळी पिस्तुलाची दोन जिवंत काडतूसे, चार रिकाम्या पुंगळ्या, साठ हजार रोख, दहा तोळे सोने, पुणे, मुळशी, जामखेड आणि धाराशिव जिल्ह्यातील जमिनीचे खरेदीखत, साठेखतासह इतर काही कागदपत्रे मिळून आली आहेत. पुढील तपास सुरू आहे. - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३.
Web Summary : Nilesh Ghaiwal, already booked under MCOCA, faces new charges after cartridges were found in his Pune home. He is currently in Switzerland. Police also froze ten bank accounts linked to Ghaiwal and his family, holding over 38 lakh rupees.
Web Summary : मकोका के तहत पहले से ही बुक नीलेश घायवळ पर पुणे स्थित घर में कारतूस मिलने के बाद नए आरोप लगे। वह फिलहाल स्विट्जरलैंड में है। पुलिस ने घायवळ और उसके परिवार से जुड़े दस बैंक खातों को भी फ्रीज कर दिया, जिसमें 38 लाख से अधिक रुपये थे।