Pranjal Khewalkar: महिलेची सहमती नसताना काढले आक्षेपार्ह व्हिडिओ; खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:13 IST2025-08-15T16:12:09+5:302025-08-15T16:13:08+5:30
महिलेने केलेल्या तक्रारीमध्ये चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केल्याची माहिती समोर आली आहे

Pranjal Khewalkar: महिलेची सहमती नसताना काढले आक्षेपार्ह व्हिडिओ; खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेची सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याप्रकरणी खेवलकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, हा नवीन गुन्हा त्यांना आणखी अडचणीत आणण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने सायबर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. ज्या तक्रारीमध्ये महिलेने चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप खेवलकर यांच्यावर केल्याची माहिती समोर आली आहे. महिलेशी संबंध ठेवताना, चोरून व्हिडीओ काढल्याचा महिलेने सायबर पोलिसांकडे आरोप केल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची चर्चा आहे. महिलेच्या या तक्रारीनंतर या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे खेवलकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ड्रग्स पार्टीनंतर खेवलकर अडचणीत
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडीतील स्टे बर्ड हॉटेलवर छापा मारून ड्रग्ज पार्टी करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेत अटक केली होती. यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हा या पार्टीचा आयोजक असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. तेथे ५ पुरुष आणि २ महिला रेव्ह पार्टी करताना आढळले. त्यात दारू, हुक्का यासह अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे दिसून आले. यावेळी कोकेन आणि गांजा सदृश्य अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर खेवलकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.