बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा; तरुणावर कोयत्याने वार
By नितीश गोवंडे | Updated: February 6, 2025 17:44 IST2025-02-06T17:23:37+5:302025-02-06T17:44:24+5:30
बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली.

बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा; तरुणावर कोयत्याने वार
पुणे : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.
फैजान इक्बाल तासीलदार (२४, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणराज सुनील ठाकर (रा. सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ, बिबवेवाडी) याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. लाकडी दांडके आणि कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्याने या परिसरात घबराट पसरली. याप्रकरणी पोलिसांनी अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे, गणराज सुनील ठाकर यांना अटक केली.
आरोपींनी बुधवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तासीलदार कारमध्ये झोपला होता. कारच्या काचेवर कोयता आपटल्याने काच फुटली. काच फुटल्याचा आवाज झाल्याने तासीलदारने कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी ठाकर आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करून डोक्यावर कोयत्याने वार केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाकर याच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करत आहेत.