अंगणवाडीताई करणार केवायसी चुकलेल्या बहिणींची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:16 IST2026-01-31T13:15:25+5:302026-01-31T13:16:57+5:30

- प्रशासनाकडून प्रक्रियेला आला वेग : जिल्ह्यातील हजारो महिलांना बसला फटका 

Anganwadi workers will verify sisters who have failed to do KYC | अंगणवाडीताई करणार केवायसी चुकलेल्या बहिणींची पडताळणी

अंगणवाडीताई करणार केवायसी चुकलेल्या बहिणींची पडताळणी

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेले 'केवायसी' अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंवा अज्ञानामुळे अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. यामुळे शेकडो पात्र महिलांचे अर्ज त्रुटींमध्ये अडकले आहेत. मात्र, आता राज्य सरकारने अशा महिलांना मोठा दिलासा दिला असून, अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

कशामुळे झाला होता गोंधळ?

केवायसी प्रक्रियेत 'तुमचे लग्न झाले आहे का?', 'बँक खाते आधारशी संलग्न आहे का?', 'उत्पन्नाचा दाखला उपलब्ध आहे का?' अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांनी 'नाही' या पर्यायाची चुकीची निवड केली. काही ठिकाणी कॅफे चालकांच्या चुकीमुळे ही माहिती चुकीची भरली गेली.

 आता ही माहिती तपासली जाणार

आधारकार्ड आणि बँक खाते लिंक असल्याची स्थिती. रहिवासी पुरावा आणि कुटुंबाचे उत्पन्न. अर्जात निवडलेले पर्याय आणि प्रत्यक्ष कागदपत्रे यांची जुळवाजुळव, नाव, वय, पत्ता असा वैयक्तिक तपशील तपासला जाईल. 

नोव्हेंबर - डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते अडकले

केवायसी पूर्ण नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते बँक खात्यात जमा होऊ शकले नाहीत. सणासुदीच्या काळात पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. मात्र, पडताळणी यशस्वी झाल्यावर हे थकलेले हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. 

पात्र महिलांना जि.प. मतदानापूर्वी मिळणार हप्ता

जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहे. पात्र महिलांची पडताळणी पूर्ण करून त्यांच्या खात्यात रखडलेले हप्ते जमा करण्याचा मानस आहे. मतदानापूर्वी 'लाडक्या बहिणीं'चा रोष कमी करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

हजारो अर्ज 'पेंडिंग' व 'रिजेक्ट' च्या रांगेत

ऑनलाइन फॉर्म भरताना किंवा केवायसी करताना माहिती भरण्यात चुका झाल्याने हजारो महिलांचे अर्ज 'रिजेक्ट' किंवा 'पेंडिंग'च्या रांगेत गेले होते. वारंवार सेतू केंद्रावर जाऊनही तांत्रिक अडथळे दूर होत नव्हते. आता सरकारने अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवल्याने महिलांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही.

Web Title : आंगनवाड़ी कार्यकर्ता 'लाडली बहिन' योजना के लिए केवाईसी त्रुटियों का सत्यापन करेंगी

Web Summary : आंगनवाड़ी कार्यकर्ता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन' योजना के आवेदनों में केवाईसी त्रुटियों का सत्यापन करेंगी। कई महिलाओं ने गलतियाँ कीं, जिससे आवेदन अस्वीकृत या लंबित हो गए। इस सत्यापन का उद्देश्य स्थानीय चुनावों से पहले लंबित किस्तों को जारी करना है, जिससे हजारों महिलाओं को लाभ होगा।

Web Title : Anganwadi Workers to Verify KYC Errors for 'Ladki Bahin' Scheme

Web Summary : Anganwadi workers will verify KYC errors in the 'Mukhyamantri Majhi Ladki Bahin' scheme applications. Many women made mistakes, leading to rejected or pending applications. This verification aims to release pending installments before local elections, benefiting thousands of women.