"आंदोलनजीवी ही पंतप्रधानांनी संसदेतून आंदोलनाला दिलेली शिवी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 22:08 IST2021-02-10T21:42:05+5:302021-02-10T22:08:21+5:30
Farmer Protest: डॉ. गणेश देवी: राष्ट्र सेवा दल शेती कायद्याविरोधात १० लाख सह्या जमा करणार

"आंदोलनजीवी ही पंतप्रधानांनी संसदेतून आंदोलनाला दिलेली शिवी"
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आंदोलनजीवी ही देशाच्या पंतप्रधानाने देशाच्या सर्वोच्च सभाग्रृहातून या देशातील प्रत्येक आंदोलकाला दिलेली शिवीच आहे अशी टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केली.
या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळाले, संयुक्त महाराष्ट्र आंद़ोलनातूनच झाला. या अशा शेकडो आंदोलनातील शहिदांचा हा अपमान आहे असे देवी म्हणाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाता पाठिंबा देण्यासाठी राष्ट्र सेवा दल.काय करणार याची माहिती देण्यासाठी देवी बुधवारी पुण्यात आले होते.
आंदोलनजीवी म्हणणे अयोग्य आणि अपमानजनक आहे असे ठाम मत व्यक्त करत देवी म्हणाले, या सरकारने विरोधी विचार अस्तित्वात ठेवायचाच नाही या दिशेनेच वाटचाल सुरू केली असल्याचे दिसते आहे. पंतप्रधान ज्या सभागृहात राहून बोलले ते सभागृहही आंदोलनातूनच निर्माण झाले आहे हे ते विसरले. भारताला आंदोलनाचाही इतिहास आहे. असंख्य लोक अशा आंदोलनात सहभागी असतात. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलनही याला अपवाद नाही. केंद्र सरकार हे एका राज्यातील शेतकर्यांचे आंदोलन आहे अशी कितीही टीका करो, पण खरे तर ते आता देशाचेही राहिलेली नाही, आंतरराष्ट्रीय होत चालले आहे. मात्र ते मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, व त्यातूनच सर्वोच्च पदावरील व्यक्तीने अशी अवमानजनक भाषा वापरली आहे.
सेवा दलाच्या वतीने कर्नाटक व महाराष्ट्रातून शेती कायद्याच्या विरोधात १० लाख सह्या जमा केल्या जातील. सेवा दल सैनिक, समविचारी संघटना यांचे सदस्य या सह्या गावांगावांमधून जमा करतील. त्या सर्व दोन्ही राज्यांच्या राज्यपालांना व राष्ट्रपतीनांही देण्यात येतील. याशिवाय अन्य काही ऊपक्रमही सेवा दल.करत आहे अशी माहिती देवी यांनी दिली.