पुणे : गणेशपेठ मच्छी मार्केट येथील व्यापाऱ्यांना धमकावून व दहशत पसरवून मागील १२ वर्षांत बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्यासह त्याच्या घरातील महिला व इतर अकरा जणांनी २० कोटी रुपयांपेक्षा अधिकची खंडणी उकळल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे नेस्तनाबूत करण्याचे काम सुरू केले असून, टोळीने केलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या मदतीने कारवाई केली जात आहे. आंदेकर टोळीविरोधात खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, संघटीत गुन्हे करणे, संगनमताने गुन्हे करणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी पुण्यातील टोळ्यांविरोधात केलेल्या कठोर कारवाईमुळे, दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, या कारवाईमुळे मनोबल वाढल्याने एका तक्रारदाराने गेल्या बारा वर्षांपासून बंडू आंदेकर टोळीला प्रोटेक्शन मनी स्वरुपात खंडणी दिल्याचे उघड केले आहे. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी टोळीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. बंडू आंदेकर टोळीने आजपर्यंत २० कोटींपेक्षा अधिकची रक्कम मासे व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा देण्याच्या व इतर सहकार्य करण्याच्या नावाखाली प्रोटेक्शन मनी म्हणून उकळली. या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी कर्जबाजारी झाल्याची उदाहरणे आहेत. त्यांनी या आंदेकर टोळीची दहशत निमूटपणे सहन केली आहे. त्यामुळेच आता पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी टोळीविरोधात आक्रमक व कठोर कारवाई सुरू केली आहे. पुणे शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पुणे शहर पोलिस कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे. नागरिकांनी कोणत्याही दहशतीला न घाबरता होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अजित जाधव करत आहेत. शहरामध्ये असे आरोपी, त्यांची टोळी व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांविरूध्द जोपर्यंत अशा टोळ्यांचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत अशीच कारवाई सुरू राहील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.