अल कायदाचा समर्थक जुबेरच्या लॅपटॉपमधील डाटाचे विश्लेषण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:40 IST2025-11-15T09:39:52+5:302025-11-15T09:40:08+5:30
Crime News: 'अल कायदा' या जागतिक दहशतवादी संघटनेचा कथित समर्थक असलेल्या जुबेर हंगरगेकर याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाइलची तपासणी सुरू आहे.

अल कायदाचा समर्थक जुबेरच्या लॅपटॉपमधील डाटाचे विश्लेषण सुरू
पुणे - 'अल कायदा' या जागतिक दहशतवादी संघटनेचा कथित समर्थक असलेल्या जुबेर हंगरगेकर याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाइलची तपासणी सुरू आहे. ही माहिती एक 'टीबी'पेक्षा (टेरा बाइट्स) अधिक असून, त्याच्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. त्यासाठी जुबेरच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिले.
'अल कायदा इन इंडियन सबकॉंटिनेन्ट' (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर (वय ३७, रा. कोंढवा) याला एटीएसने २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याला पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी दुपारी विशेष न्यायालयासमोर उभे करण्यात आले.