उरसात तमाशावरून वाद; तिघांना दगड - विटांनी बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:50 IST2025-03-20T16:44:05+5:302025-03-20T16:50:58+5:30
पहाटे तीनच्या सुमारास तमाशासमोर नाचताना वाद झाला असता आरोपींनी तिघांना दगट-विटांनी, तसेच पट्ट्याने मारहाण केली

उरसात तमाशावरून वाद; तिघांना दगड - विटांनी बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा
पुणे : गावातील उरसात आयोजिलेल्या तमाशात वाद झाल्याने तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हवेली तालुक्यातील जांभळी गावात घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला. अभिजित रामचंद्र कोंढाळकर (वय २५), योगेश संजय शेंडगे (२३) आणि साई विठ्ठल वशिवले (१७) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सचिन दत्तात्रय बाबर, विकी दत्तात्रय बाबर, विकास महादू चौधरी, गणेश दत्तात्रय चौधरी, सुधीर किसन चौधरी (सर्व रा. जांभळी, ता. हवेली) यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अभिजित कोंढाळकर याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला परिसरातील जांभळी गावात वार्षिक उरूस आयोजित करण्यात आला होता. गावातील यात्रेनिमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास तमाशासमोर नाचताना आरोपी आणि कोंढाळकर, शेंडगे, वशिवले यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांना दगट-विटांनी, तसेच पट्ट्याने मारहाण केली. डोक्यात दगड घातल्याने तिघेजण जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम पुढील तपास करीत आहेत.
वडगाव शेरीत तरुणाचा ३५ हजारांचा मोबाइल हिसकावला
रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने ३५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (दि. १८) रात्री साडेअकराच्या सुमारास वडगाव शेरीतील सेन्ट अनॉल्डस स्कूलसमोर घडली. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वडगाव शेरीत राहायला असून, १८ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तो सेन्ट अनॉल्डस स्कूलसमोरून पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधली. तरुणाजवळ येऊन त्याच्या हातातील ३५ हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. तरुणाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक असवले करत आहेत.