ससूनमधील डॉक्टरांनाही सहआरोपी करा; आमदार रविंद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
By राजू इनामदार | Updated: October 11, 2023 18:46 IST2023-10-11T18:45:57+5:302023-10-11T18:46:18+5:30
ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला असून त्यासंदर्भात पोलीस तपास सुरू

ससूनमधील डॉक्टरांनाही सहआरोपी करा; आमदार रविंद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पुणे: ससूनमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या गुन्ह्यात सहआरोपी करावी अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून केली. ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला असून त्यासंदर्भात पोलिस तपास सुरू आहे.
धंगेकर यांनी सांगितले की, ललित पाटील याला अंमलीपदार्थ विरोधी कायद्यातंर्गत अटक करण्यात आली होती. तो आजारी असल्याचा बहाणा करून ससूनमध्ये आला. तिथे त्याच्यावर महिनोंमहिने उपचार सुरू होते असे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तो तिथे बसून अमली पदार्थांचे रॅकेट चालवत असल्याचे आता उघड झाले आहे. ससूनमध्ये राहून तो बाहेर फिरायला वगैरे जात होता. त्याच्यावर तब्बल ६ डॉक्टर उपचार करत होते. त्यात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचाही समावेश आहे.
इतके सगळे होऊनही अधिष्ठाता डॉ. ठाकूर एक शब्दही बोलायला तयार नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोणीही काही सांगायला तयार नाही असे धंगेकर म्हणाले. ललित पाटील पळून जाण्यात तेथील डॉक्टरांचा हात आहे ही उघड गोष्ट आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे अशी मागणी करत असल्याचे धंगेकर म्हणाले.