रुग्णालय प्रशासनाबरोबरच विश्वस्तांचीही चौकशी करावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:38 IST2025-04-06T14:34:45+5:302025-04-06T14:38:53+5:30
- महापालिकेने वसूल करावा मालमत्ता कर

रुग्णालय प्रशासनाबरोबरच विश्वस्तांचीही चौकशी करावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
पुणे : गोरगरिबांची सेवा करणार, असे सांगून सरकारकडून सवलतीच्या दरात भूखंड मिळवणारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सेवा करत नाहीच, उलट व्यवसाय थाटला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. पक्षातर्फे शनिवारी दुपारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
लक्ष्मी दुधाने, स्वाती पोकळे, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, स्वप्नील दुधाने, गिरीश गुरनानी, दीपक जगताप, दीपक कामठे, वैभव कोठुळे, पूजा काटकर, सुरेश गुजर, त्रिंबक मोकाशी, रचना ससाणे, गणेश नलावडे, मंजिरीताई घाटगे, रूपालीताई शेलार, पंडित कांबळे, आसिफ शेख, हेमंतकाका बधे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. रुग्णालय प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत त्यांनी रुग्णालयाचा परिसर दणाणून टाकला. शुक्रवारी दिवसभर झाला तोच त्रास आजही रुग्णालयात येणाऱ्या व जाणाऱ्या रुग्णांना सहन करावा लागला.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्याच माध्यमातून मंगेशकर कुटुंबाने काही कोटी रुपयांचा हा भूखंड वार्षिक १ रुपया भाडे या दराने दीर्घ मुदतीवर मिळवला. त्यावेळी मान्य केलेल्या अटी-शर्तींना रुग्णालयाने हरताळ फासला असल्याचे पैशांअभावी गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने सिद्ध झाले. त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक रोषामुळे सरकार जागे झाले.
चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा झाली. मात्र, या समितीने रुग्णालयातील एखाद्या डॉक्टरला दोषी धरून प्रकरण सोडू नये, रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाचीही चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.