बारामती : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा बाजारात महिन्याभरापूर्वीच आला आहे. मात्र, बाजारात आवक कमी असल्यामुळे हापूस आंब्याचे दर कडाडलेले आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा किंवा आमरसाचा नैवेद्य पितरांना अर्पण करण्याची परंपरा आहे, त्यामुळे विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याला विशेष मागणी असते. मात्र, अधिक दरामुळे आंबा अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. परिणामी, अक्षय तृतीयेच्या सणादिवशी देखील आंब्याचा गोडवा फिका असल्याचे चित्र आहे. बाजारात देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, कर्नाटक हापूस, केशर आंबा, कोकणातील पायरी आंबा, बिटकी आंबा, देशी आंबा, सोनपरी इत्यादी आंबे बाजारात उपलब्ध आहेत. ओरिजिनल देवगड हापूस सुमारे २१० ते २५० ग्रॅम वजनातील आंबे १८०० ते १९०० रुपये प्रति डझन दराने उपलब्ध आहेत. त्यामुळे आंबा अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. अधिक दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, परिणामी सर्वसामान्यांच्या ताटात अद्यापही आमरसाची वाटी गायब आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत दरात मोठी तफावत आहे. ग्रामीण-शहरी बाजारातही महागाईची झळ बसताना दिसत आहे. अक्षय तृतीया निमित्त घराघरात आंब्यांचा गोडवा अनुभवण्याची परंपरा असताना, यंदा आंब्यांच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे हा गोडवा फिक्का पडल्याचे चित्र आहे. बाजारात आंब्यांचे दर अक्षरशः कडाडले असून, सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. मागील वर्षी हापूस आंबा ४०० ते ७०० रुपये प्रति डझन दराने उपलब्ध होता. तर यंदा त्याच आंब्यासाठी ८०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. केशर व इतर प्रकारांमध्येही ३० ते ५० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. बारामती येथील श्री गणेश भाजी मंडईचे अध्यक्ष चिउशेठ जंजीरे यांनी गतवर्षीच्या तुलनेत १० ते ३० टक्के आंब्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागात अल्प प्रमाणात खरेदी
अक्षय तृतीयसाठी आंबा पूजन करण्यात येत असल्याने वाढत्या दराने का होईना अल्प प्रमाणात खरेदी केली जात आहे. शहरी भागात मोठ्या बाजारपेठांमध्ये आंब्यांची उपलब्धता तुलनेने जास्त असली तरी दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबेही मर्यादित खरेदीकडे वळली आहेत.शहरी व ग्रामीण व्यापाऱ्यांच्या मते, उत्पादन घट आणि वाढलेला खर्च यामुळे दर वाढ अपरिहार्य झाली आहे. सामान्य ग्राहकांच्या मते, सणासुदीच्या काळात आवश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. एकूणच, सणाचा आनंद वाढवणारा आंबा यंदा महागाईच्या छायेत सापडल्याचे दिसून येत आहे.
Web Summary : High mango prices cast a shadow over Akshaya Tritiya celebrations. Reduced supply and increased costs have made mangoes unaffordable. Consumers are buying less, impacting the festive tradition of enjoying mangoes.
Web Summary : अधिक कीमत के कारण अक्षय तृतीया के उत्सव पर आम का स्वाद फीका पड़ गया। कम आपूर्ति और बढ़ी हुई लागत के कारण आम खरीदना मुश्किल हो गया है। उपभोक्ता कम खरीद रहे हैं, जिससे त्योहार की परंपरा प्रभावित हो रही है।