पुणे मेट्रोच्या चारही मार्गांच्या विस्तारीकरणाबाबत अजित पवार यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 20:35 IST2020-01-17T20:01:29+5:302020-01-17T20:35:11+5:30
पुणे मेट्रो आता पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो नावाने ओळखली जाणार

पुणे मेट्रोच्या चारही मार्गांच्या विस्तारीकरणाबाबत अजित पवार यांच्या सूचना
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या चार मेट्रो मार्गांचा विस्तार करून त्याची उपयुक्ता अधिक करावी, तसेच पुणे मेट्रोचे नाव बदलून ‘पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असे करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेत याबाबतच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण व शासनातर्फे शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा व प्रकल्पांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. यावेळी त्यांनी, महामेट्रो व पीएमआरडीएतर्फे साकारण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण करावे असे सांगितले. यामध्ये महामेट्रोतर्फे सुरू असलेला वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत,पिंपरी ते स्वारगेट मार्ग निगडी ते कात्रजपर्यंत व शिवाजीनगर न्यायालय ते हडपसरपर्यंतचा मार्ग हडपसरऐवजी लोणी काळभोर (कदमवाकवस्तीपर्यंत) वाढविण्यात यावा अशी सूचना केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. मेट्रोची जलद गतीने सुरू असलेली कामे पाहता महामेट्रोला राज्य शासनाकडून देणे असलेले २०० कोटी रूपयेही लागलीच दिले जाणार असून, विकास कामांकरिताचा राज्य शासनाच्या हिश्शाचा निधी त्या-त्या वर्षीच दिला जाईल याची खबरदारी मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने घेईल असेही ते म्हणाले.
पीएमआरडीएमार्फत साकारण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गाचाही विस्तार करण्याबाबत पवार यांनी पीएमआरडीएला सूचना दिल्या. हा मार्ग हिंजवडी ऐवजी माण पिंरगुटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.तसेच शिवाजीनगर ते माण हिंजवडी असे या मेट्रो मार्गाचे आता नाव राहणार आहे. शहरात सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करून, नव्याने आखणी करण्यात आलेले प्रकल्प चार वर्षात पूर्णत्व:ला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील रिंग रोड लक्षामध्ये घेऊन हे काम पूर्ण झाले पाहिजे. मेट्रो प्रकल्पासाठीची आवश्यक शासकीय यंत्रणा बाधित न होण्याच्या सूचना व त्यासाठीचे प्रस्ताव तसेच वित्तीय तरतूद यांचे नियोजन महाआघाडी सरकारमधील सर्वांशी चर्चा करून उपलब्ध करून देणार आहोत. पुणेकरांच्या हिताचा व भविष्याचा विचार करता हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा मला विश्वास असल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान मेट्रो मार्गातील जमिनी या पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएच्या विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.