"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:55 IST2025-05-21T16:47:46+5:302025-05-21T16:55:13+5:30
Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर संताप व्यक्त होत आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट सवाल केला आहे.

"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
Vaishnavi Hagawane News: वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पुण्यातील राजकारण तापले असून, थेट अजित पवारांना प्रश्न विचारला जात आहे. वैष्णवीचा सासरच्यांकडून हुंड्यासाठी सातत्याने छळ होत होता. तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून, आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अजित पवारांनाच सवाल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या केली गेली आहे, असा आरोप तिच्या आईवडिलांकडून केला जात आहे. वैष्णवीला खूप मारले गेले. तिच्या अंगावर खूप खुणा आहेत. १६ मे रोजी तिला टॉर्चर करून मारण्यात आले. त्यानंतर तिघी घरातून निघून गेल्या. दुपारी १२ वाजता त्या आल्या आणि पुन्हा अमानुषपणे मारले. त्यानंतर वैष्णवीने आत्महत्या केली, असा आरोप वैष्णवीच्या काकाने केला आहे.
सुषमा अंधारे अजित पवारांना काय म्हणाल्या?
वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना थेट सवाल केला आहे. राष्ट्रवादीचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार आहे?, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
वाचा >>एमआयटी शिक्षण संस्थेतील कर्मचारी महिलेचा विजेच्या झटक्याने मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना
"जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवलेला अटक कधी होणार? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार?", असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला.
जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवलेला अटक कधी होणार ?
— SushmaTai Andhare (@andharesushama) May 21, 2025
अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? pic.twitter.com/bTRGQk3PgW
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात काय?
वैष्णवी हगवणेच्या मृतदेहाचे पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. जयदेव ठाकरे आणि ताटिया यांनी लिहिलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळला गेल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. रक्त साकळल्याचे डागही आढळून आले आहेत.
वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले गेले आहे. पण, तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. तिची हत्या करण्यात आल्याच्या अनुषंगाने तपास करावा अशी मागणीही कुटुंबीयांना केली आहे.