अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जनसुनावणी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:00 IST2025-09-12T15:59:57+5:302025-09-12T16:00:18+5:30

प्रत्येक तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याचा पाठपुरावा घेणार आहेत

Ajit Pawar will personally listen to the complaints of every citizen; NCP's public hearing campaign for municipal elections | अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जनसुनावणी मोहीम

अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार; महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जनसुनावणी मोहीम

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणेकरांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ या नागरी संवाद उपक्रमाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी हडपसर येथून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा उपक्रम पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अन्य भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.

पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना तयार करताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागावे, असे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यातूनच आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी जनसुनावणी मोहीम सुरू केली आहे. त्यातूनच १३ सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत हडपसर मतदारसंघात नेताजी सुभाषचंद्र कार्यालय येथे जनसुनावणी घेणार आहे.

अजित पवार थेट संवाद साधणार

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेणार आहेत. या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण केले जाणार आहे. तक्रारींवर वेळेवर कार्यवाही व्हावी, यासाठी काटेकोर फॉलोअप यंत्रणा सज्ज असणार आहे. प्रत्येक तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याचा पाठपुरावा घेणार आहेत. या जनसुनावणीसाठी किऑस्क, व्हॉट्सॲप तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

उपमुख्यमंत्री पवारांचा रविवारी दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी परिवार स्नेह भेट दौरा करणार आहे. त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातील २० ठिकाणी ते भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यांचा कात्रज येथे समारोप होणार आहे, असे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

Web Title: Ajit Pawar will personally listen to the complaints of every citizen; NCP's public hearing campaign for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.