"अजित पवार तुरूंगात जाणार हा केवळ एक शब्दप्रयोग", किरीट सोमय्यांचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 20:01 IST2021-11-21T20:01:29+5:302021-11-21T20:01:37+5:30
'तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहावे. तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा'

"अजित पवार तुरूंगात जाणार हा केवळ एक शब्दप्रयोग", किरीट सोमय्यांचा यू-टर्न
पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा देणा-या भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यू-टर्न घेतला आहे. ‘हा केवळ एक शब्दप्रयोग आहे, तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणे, एवढेच अपेक्षित आहे,’ असे त्यांनी पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
किरीट सोमय्या रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी ‘‘अजित पवार यांना तुरूंगात टाकणार, अशी टीका आपण करता. त्यांना अजून काही तुरूंगात टाकले नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का?’’ या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ‘‘तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहावे. तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही, ’ असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर सोमय्यांची टीका
''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, ‘महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटी ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटीस दिल्या गेल्या. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. या कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे आहेत.''