सामान्यांच्या संकटकाळात धावून येणारे 'अजितदादा'; जखमी कार्यकर्त्याच्या एका कॉलवर केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 20:02 IST2022-11-24T20:01:46+5:302022-11-24T20:02:16+5:30
डॉक्टरांना सूचना देत तरुणावर आवश्यक उपचार करण्याबाबत चर्चा केली

सामान्यांच्या संकटकाळात धावून येणारे 'अजितदादा'; जखमी कार्यकर्त्याच्या एका कॉलवर केली मदत
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच मजबुत पकड असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. पवार यांची त्यासाठी असणारी कार्यपध्दती बुधवारी(दि २३ ) झालेल्या एका घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. अपघातात गंभीर जखमी कार्यकर्त्याला पाहुन एकाने थेट अजित पवार यांना मदत मागितली. पवार यांनी देखील तातडीने जखमीला मदत करीत उपचार मिळवुन दिले.
कटफळ(ता.बारामती) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तानाजी पांडुरंग मोकाशी बुधवारी (दि २३) हे शिखर शिंगणापूर वरून घरी परतीच्या वाटेवर होते. यावेळी मेखळी मार्गावर डोलेर्वाडी फाट्या नजिक टँकरने अचानक वळण घेतले. त्यामुळे मोकाशी यांच्या दुचाकीची टँकरला धडक लागून अपघात झाला. या अपघातात मोकाशी यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली.
ही घटना घडल्यावर एकाने थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. तसेच या अपघाताची माहिती दिली. पवार यांनीही तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना त्याच्या उपचारासाठी आवश्यक मदत करण्याची सुचना केली. त्यानंतर देखील ते थांबले नाहित. प्रत्येक तासाला त्यांनी या कार्यकर्त्याच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांना सूचना देत त्याच्यावर आवश्यक उपचार करण्याबाबत चर्चा केली. ‘अजितदादां’च्या बांधिलकीची आज सर्वत्र चर्चा होती.