"उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये...", दीपक केसरकरांवर अजित पवार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 21:08 IST2022-07-14T21:07:38+5:302022-07-14T21:08:19+5:30
महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला होता

"उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये...", दीपक केसरकरांवर अजित पवार संतापले
पुणे : दीपक केसरकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांनी अनेक खुलासे केले आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले, 1992 साली केसरकर फार ज्युनिअर होते, त्यांनी काळजीपूर्वक विधान केली पाहिजेत. बारकाईने माहिती घ्यावी, उचलली जीभ लावली टाळ्याला असं त्यांनी करू नये.1992 ला शिवसेना फुटली तेव्हा शरदराव महाराष्ट्रात नाही तर केंद्रात होते. मंडल आयोगाच्या भूमिकेवरून 1992 साली शिवसेना फुटली मंडल आयोगाबाबत घेतलेली भूमिका छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पटली नाही, म्हणून ते बाहेर पडले.
''शिवसेनेच्या तेव्हाच्या नेतृत्वाचे आणि नारायण राणे यांचे जमत नव्हते म्हणून ते बाहेर पडले. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही राणे बाहेर पडले. दीपक केसरकर एकेकाळचे आमचे सहकारी, त्यांनी माहिती घेऊन बोलावे. असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.''
काय म्हणाले होते केसरकर
मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार मला विश्वासात घेऊन सांगायचे. नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे. ही अट ठेवली नसल्याचे शरद पवारांनी मला सांगितल्याचे केसरकर म्हणाले. तसेच छगन भुजबळ यांना तर शरद पवार स्वत: बाहेर घेऊन गेले होते.असेही त्याने सांगितले.