"अजितदादा सत्तेतून बाहेर पडा..."; बारामतीत निषेध मोर्चा, आरक्षणासाठी १ महिन्याचा ‘अल्टीमेटम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:49 IST2023-09-04T15:48:14+5:302023-09-04T15:49:43+5:30
अपयशी आलेल्या नेत्यांच्या विरोधात, राज्य शासनाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय यावेळी एल्गार सभेत घेण्यात आला....

"अजितदादा सत्तेतून बाहेर पडा..."; बारामतीत निषेध मोर्चा, आरक्षणासाठी १ महिन्याचा ‘अल्टीमेटम’
बारामती (पुणे) : जालन्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणासाठी एक महिन्याचा ‘अल्टीमेटम’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या नेत्यांनी मराठा आरक्षण मिळविण्याचे प्रयत्न करावेत. अपयशी आलेल्या नेत्यांच्या विरोधात, राज्य शासनाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय यावेळी एल्गार सभेत घेण्यात आला.
सोमवारी( दि. ४) बारामतीत छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथून सकाळी १० वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात असणारा मोठा जनसमुदाय व भगव्या झेंडे व घोषणांमुळे वातावरण भगवेमय झाले होते. यावेळी मराठा समाजाचे बंधु, भगिनी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा गुणवडी चौक, गांधी चौक मार्गे भिगवण चाैकात पोहचला. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापचं, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, अजितदादा परत या, कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला. भिगवण चौकात सांगता सभा झाली.
भाजपची दिल्लीत सत्ता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांचे मोदी, शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्या संबंधाचा वापर करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीररित्या सोडवावा. ५० टक्कयांची अट काढल्यावर आरक्षण मिळणे शक्य आहे. ही अट काढण्यासाठी तिघा नेत्यांनी प्रयत्न करावा. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे. या कालावधीत संबंधितांना मराठा आरक्षण देण्यात अपयश आल्यास ‘त्या’नेत्यांसह राज्य शासनाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नेत्यांचे मोठे उद्योगधंदे आहेत, कारखाने आहेत. त्यांची मुले परदेशात शिकतात. तुमचं आमचं काय आहे, घरादाराचा जाळ करुन नेत्यांच्या मागे फिरणे बंद करा, असे आवाहन मराठा युवकांना यावेळी करण्यात आले. नेत्यांवर समाजाचा दबाव कायम ठेवा,तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल.
यावेळी मराठा सामाज बांधवांनी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणींचे विश्लेषण केले. काही विद्यार्थ्यांनी चांगले मार्क असताना देखील फक्त ‘ओपन ’कॅटेगिरी मध्ये जन्माला आलो म्हणून नंबर लागत नाही, अशी खंत व्यक्त केली. दरम्यान, बारामती बंदला, बारामती व्यापारी महासंघ, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, जळोची येथील फळे व भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय आडतदार संघटना आदींनी पाठींबा व्यक्त केला. त्यामुळे आजचा बंद १०० टक्के यशस्वी झाला.
पोलीसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सभेच्या मार्गावरील सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती. मोर्चा व बंदच्या धर्तीवर काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सभेच्या शेवटी मराठा समाजाच्या भगिनींनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर झालेल्या हल्ल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे. मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागण्यांचे निवेदन दिले.
....तर ‘अजितदादां’ नी सत्तेतून बाहेर पडा-
काटेवाडी पाठोपाठ बारामतीत दूसऱ्या दिवशी अनेक आंदोलकांनी एका रात्रीत सत्तेत सहभागी होता येते. तर आरक्षणासाठी देखील केंद्राची मदत घ्यावी. आरक्षण मिळत नसल्यास सत्तेतून बाहेर पडावे, तसेच आरक्षण द्यायला न जमल्यास सत्तेतून पायउतार व्हा, असे देखील काही आंदोलकांनी परखडपणे सुनावले.