बारामती: ‘कुटुंबातील आपलं माणूस गेल्यासारखं सारं काही सुन्न झालंय. काळाकुट्ट अंधार दाटलाय. दादा गेल्यावर विश्वासच बसत नाही. आम्ही १ली ते १०वी एकाच वर्गात शिकलो. आमराईतील आप्पासाहेबांच्या बंगल्यावर ते राहायचे, मी समोर बोहरी चाळीत. गोट्या, विटी-दांडू, पतंग उडवणे, क्रिकेट, खो-खो... हे सगळे खेळ एकत्र खेळलो’, अशी आठवण अजितदादांचे बारामतीतील वर्गमित्र उदय शहा कळसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावुक होऊन सांगितली.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबतच्या बालपणीच्या आठवणी सांगताना कळसकर यांचा आवाज कातर झाला होता. खोल गेलेल्या आवाजात ‘लाेकमत’शी बोलताना त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी केली. ते म्हणाले, आम्हा सर्व मित्रांची त्यांच्या जाण्याने मोठी वैयक्तिक हानी झाली आहे. आम्ही दोघे १ ली ते १० वी एकाच वर्गात शिकलो. आप्पासाहेबांच्या आमराई येथील बंगल्यावर ते रहायला होते. तर त्यांच्या समोर बोहरी चाळीत मी रहायला होतो. लहानपणी गोट्या खेळणे, विटी-दांडू खेळणे, पतंग उडविणे सारखे अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो. त्यांना क्रिकेट आणि खो-खोची देखील आवड होती. त्यांची ही अचानक अवेळी झालेली ‘एक्झिट’ आहे. आमचा मित्र महाराष्ट्राचा नेता होता, मोठा मंत्री होता, पण त्यांनी आमच्याशी बोलताना, वागताना तो आव कधीच आणला नाही. वर्गमित्र म्हणूनच ते आमच्याशी नातं ठेवून होते.अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
राजकारण हा आमचा विषय नव्हता, राजकारणापलीकडे जाऊन दादांनी आमची मैत्री नेहमीच जपली. कोणत्याही कार्यक्रमात भेट झाल्यावर आवर्जून जवळ बाेलावून खांद्यावर हात टाकून आमच्याशी गप्पा मारीत. कुटुंबियांची, आमची वैयक्तिक विचारपूस करीत. त्यांच्या मनमोकळा आणि मिश्कील स्वभावाने आमच्या मनात कायमच घरं केलं आहे. २०१२ मध्ये त्यांच्याच पुढाकारातून पाचगणीला आम्हा वर्गमित्रांचे ‘गेट टुृगेदर’ पार पडलं होतं. त्यावेळी ते पहिल्यांदाच ‘डीसीएम’ झाले होते. त्या कार्यक्रमासाठी दादा सुनेत्रावहिनींसह उपस्थित होते. त्याच दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आल्याची आठवण शहा कळसकर यांनी सांगितली. अजितदादा हे स्पष्टवक्ते, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्याने मैत्रीची, नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली आहे.
Web Summary : Ajit Pawar's classmate, Uday Kalaskar, deeply mourns his friend's passing. Sharing childhood memories of games and camaraderie, Kalaskar recalls Pawar's down-to-earth nature and their enduring bond beyond politics. A void remains after this untimely exit.
Web Summary : अजित पवार के सहपाठी, उदय कलस्कर, अपने दोस्त के निधन पर गहरा शोक व्यक्त करते हैं। बचपन के खेल और दोस्ती की यादें साझा करते हुए, कलस्कर पवार की विनम्रता और राजनीति से परे उनके स्थायी बंधन को याद करते हैं। इस असामयिक निधन से एक खालीपन आ गया है।