अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:39 IST2024-12-18T15:37:26+5:302024-12-18T15:39:18+5:30
काहीही समजून न घेता भुजबळ टीका करत सुटले आहेत, वास्तविक आता त्यांनी शांत राहायला हवे

अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर
राजू इनामदार
पुणे : मंत्रिमंडळात घेतले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांच्या समर्थनार्थ समता परिषद या त्यांच्या संघटनेने केलेल्या आंदोलनाला पक्षाच्या शहर शाखेने बुधवारी प्रत्युत्तर दिले. शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी परिषदेचे हे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना मानकर म्हणाले, छगन भुजबळ हे पक्षाचे मान्यवर नेते आहेत. गेली अनेक वर्षे ते मंत्री आहेत. फक्त त्यांनाच नाही तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनाही मंत्रिपद दिलेले नाही. ते शांत असताना भुजबळ मात्र विनाकारण आक्रस्ताळेपणा करत आहेत. त्यांच्या समता परिषद तसेच काही ओबीसी संघटनांनी तर अजित पवार यांचा अवमान होईल, असे कृत्य करण्यापर्यंत मजल मारली. असे चालणार नाही. आम्हीही त्यांना उत्तर देऊ शकतो. मात्र, राजकारणात सभ्यता हवी. ती आम्ही पाळतो, याचा अर्थ काहीही सहन करू, असे नाही. समता परिषद किंवा ओबीसी संघटनांनी शांत राहावे, विनाकारण वातावरण खराब करू नये.
भुजबळ यांनीही काहीही कारण नसताना अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. काही कारण असल्याशिवाय ते दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांना बाजूला ठेवतील असे संभवत नाही. ते काहीही समजून न घेता भुजबळ टीका करत सुटले आहे. वास्तविक आता त्यांनी शांत राहायला हवे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वयाची टीका करता, तुम्हीही आता वयोवृद्धच झाला आहेत. त्यामुळे समजून उमजून शांत बसा, पक्षात तुमचा कायमच सन्मान ठेवला जातो, जाईल. तो सन्मान स्वीकारा, अन्यथा अजित पवार यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते पक्षात आहेत, हेही त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा मानकर यांनी दिला.