अजित पवारांची जोरदार बॅटिंग; जयंत पाटील यांना रोहित शर्माची उपमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 15:02 IST2018-04-29T15:02:38+5:302018-04-29T15:02:38+5:30
अजित पवारांच्या फटकेबाजीला उपस्थितांची दाद

अजित पवारांची जोरदार बॅटिंग; जयंत पाटील यांना रोहित शर्माची उपमा
पुणे: ज्या पद्धतीनं काल अडचणीत असणाऱ्या मुंबईला रोहित शर्माने जिंकून दिलं, त्याप्रमाणे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत जिंकून द्यावं, अशी राजकीय बॅटिंग अजित पवार यांनी पुण्यात केली .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची एकमताने निवड झाल्यानंतर ते बोलत होते.
अजित पवार यांनी भाषणात क्रिकेटचा उल्लेख करत जोरदार फटकेबाजी केली. 'सध्या आयपीएलचे दिवस आहेत. जयंत पाटील हे उत्तम बॅट्समन आहेत. ते अनेकदा फिरकीही घेत असतात. मुंबई आयपीएलमधून जवळपास बाहेर पडली, असे वाटत असताना, ज्या पद्धतीनं रोहित शर्मा शेवटपर्यंत टिकून राहिला, त्या पद्धतीनं आमचे कॅप्टन झालेल्या पाटील यांनी विजय संपादन करावा, अशी मी त्यांना विनंती करतो,' असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांनी त्यांना टाळ्यांनी दाद दिली.
दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्येच्या विवाहाचं आमंत्रण त्यांनी यावेळी सर्वांना दिलं. 'आर. आर. पाटील यांचा स्वच्छ प्रतिमेला कोणीही विसरू शकत नाही.आज ते आपल्यात नाहीत.मात्र 1 मे रोजी त्यांची कन्या स्मिताचे लग्न आहे. पुण्यात होणाऱ्या या लग्नाची सुमनताई पाटील यांनी पत्रिका दिली असेलच. पण राहिली असेल तरी हक्कानं येऊन सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावेत,' असं आवाहन त्यांनी केलं.