‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:38 IST2025-05-29T12:36:22+5:302025-05-29T12:38:24+5:30

छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडामंत्री भरणे यांना बरोबर घेत गेले अनेक वर्षे विरोधक असणाऱ्या जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी केली.

Ajit pawar advice to the new director of Chhatrapati; Meeting held at Katewadi residence | ‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी बुधवारी (दि. २८) पहिल्याच दिवशी भल्या सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी निवासस्थानी नूतन संचालक मंडळाची पवार यांच्या समवेत बैठक पार पडली. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पवार यांनी संचालक मंडळाला कारखान्याचे पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी कानमंत्र दिला.

सहकारातील अभ्यासू आणि जाणकार नेते म्हणून पृथ्वीराज जाचक यांची ओळख आहे. त्यामुळे अडचणीतील छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडामंत्री भरणे यांना बरोबर घेत गेले अनेक वर्षे विरोधक असणाऱ्या जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी केली. या वेळी पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांचा चेहरा पाच वर्षे अध्यक्षपदासाठी जाहीर करीत जय भवानीमाता पॅनलमधून निवडणूक लढविली. त्याला सभासदांनी भरभरून प्रतिसाद देत सर्वच्या सर्व २१ जागा भरघोस मतांनी निवडून दिल्या. या पार्श्वभूमीवर पवार यांनी नूतन पदाधिकारी निवडीपूर्वी संचालक मंडळाशी समवेत संवाद साधला, तसेच पदाधिकारी निवडीबाबत सर्वांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पवार यांनी ‘छत्रपती’ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी संचालक मंडळाला कानमंत्र दिला. पदाधिकारी निवडीच्या पहिल्याच दिवशी पवार यांनी कारखान्याच्या कामाची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.

या बैठीकबाबत पृथ्वीराज जाचक यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले की, अजितदादांनी संचालक मंडळाला ‘छत्रपती’ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सूचना करीत ‘गाइडलाइन’ दिल्या. सभासदांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत राहा. पारदर्शकपणे कामाला सुरुवात करण्याचे पवार यांनी सूचित केल्याचे जाचक म्हणाले.

 
पृथ्वीराज जाचक यांची हॅटट्रीक

पृथ्वीराज जाचक यांची श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी १९९५ साली प्रथम निवड झाली. त्यानंतर १९९८ साली पुन्हा अध्यक्षपदी जाचक यांची फेरनिवड झाली. २००३ नंतर जाचक हे राष्ट्रवादी काॅंग्रेसपासून बाजूला गेले. त्यानंतर २२ वर्षांनी जाचक यांचे अध्यक्षपदी पुनरागमन झाले आहे. 

‘छत्रपती’चा कारभार कृषी पदवीधरांच्या हाती 

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे हे दोघे कृषी पदवीधर असून, वर्गमित्र देखील आहेत. या योगायोगाची चर्चा आज कारखाना परिसरात रंगली. शेतकऱ्यांच्या संबंधित असलेल्या कारखान्याचा कारभार कृषी पदवीधरांच्या हाती आल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Ajit pawar advice to the new director of Chhatrapati; Meeting held at Katewadi residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.