तावरेच्या प्रेशरने रक्ताचे नमुने बदलले; माझ्याकडून मोठी चूक, पोलीस तपासात हळनोरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:10 IST2024-05-30T12:09:58+5:302024-05-30T12:10:36+5:30
माझ्या मनाला ते पटत नव्हते, माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते, त्यामुळे दोन दिवस झोपू शकलो नाही

तावरेच्या प्रेशरने रक्ताचे नमुने बदलले; माझ्याकडून मोठी चूक, पोलीस तपासात हळनोरचा खुलासा
पुणे: कल्याणीनगर येथील अपघातानंतर बाळाच्या रक्ताचे नमुने देण्याच्या बहाण्याने तीन व्यक्ती ससून रुग्णालयात उपस्थित होत्या. तसेच विशाल अग्रवाल याने एकाला शिपाई घटकांबळे याची भेट घेण्यासाठी पाठवले होते. या चौघांचा गुन्ह्यातील सहभाग पाहता ते आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. ससूनला मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवाल याने रक्त देण्यापूर्वी एका व्यक्तीला ससून रुग्णालयात पाठवले होते. तसेच त्या माणसाने अतुल घटकांबळे याच्याशी संपर्क साधला आणि येथे कोणाशी बोलावे लागेल, याची माहिती घेतली. त्यानंतर डॉ. तावरे याच्याशी विशाल अग्रवाल याने संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच चाचणीसाठी त्या बाळाचे रक्त घेताना इतर तीन व्यक्ती याठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून त्या व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
कल्याणीनगर हायप्रोफाइल अपघात प्रकरणात गुन्हे शाखेने रक्त बदलल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी पहाटेच ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यानुसार पोलिस नेमके काय घडले, याची माहिती घेत आहेत.
'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित
दरम्यान, विशाल अग्रवाल आणि डॉ. तावरे यांचा संपर्क झाला. त्यावेळी डेड हाऊसचा शिपाई अतुल घटकांबळे हा मध्यस्थी असल्याचे समोर आले होते. त्यात आता आणखी सखोल तपास केल्यानंतर अतुल यालादेखील एक व्यक्ती कारमधून ससून रुग्णालयात भेटण्यास आली होती. ती व्यक्ती अतुल याला भेटली आणि त्याने अतुलकडून ससूनला मॅनेज करण्यासाठी काय करावे लागेल किंवा कोण करून देईल, याची माहिती घेतली. अतुलने डॉ. तावरेचे नाव सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने अतुलकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला आणि त्यानंतर विशाल अग्रवाल आणि डॉ. तावरेचा संपर्क झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
विशाल अग्रवाल व डॉ. तावरे यांचा संपर्क झाल्यानंतर तावरेनेच विशालला रक्त बदलण्याचा सल्ला दिला होता, असे समोर आले होते. त्यानंतर पुढील गोष्टी पार पडल्या. या बाळाला रक्त देण्यासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले. रक्त घेत असताना त्याठिकाणी एका बड्या कारमधून तीन व्यक्ती तेथे पोहोचल्या. रक्त घेईपर्यंत या व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. त्या व्यक्ती कोण? याबाबत पुणे पोलिसांकडून तपास केला जात असून, या चाैघांचा शोध आता पोलिस घेत आहेत.
तावरेच्या ऑफिसचा पंचनामा पूर्ण...
डॉ. तावरे याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉ. तावरे याच्या ऑफिसचा पंचनामा पूर्ण केला. तसेच त्याला सीलदेखील केले आहे. तसेच तावरे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. परंतु, त्यात काही मिळू शकले नाही, असे सांगण्यात येते. त्यासोबतच पोलिसांनी आता जप्त केलेल्या पुराव्यांचे सुसूत्रीकरण करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही, डिजिटल गोष्टी यांची पाहणी केली जात आहे.
तावरेचे डॉ. हळनोरला प्रेशर
डॉ. अजय तावरे व विशाल यांचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी मला तावरे यांनी प्रेशर केले, असे डॉ. हळनोर याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले आहे. रक्ताचे नमुने बदलले; पण माझ्या मनाला ते पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते. त्यामुळे दोन दिवस झोपू शकलो नाही, असे हळनोर म्हणत आहे. याबाबत कितपत त्याच्यावर विश्वास ठेवावा? असा प्रश्न आहेच.