सलग सुट्यांमुळे विमान व ट्रॅव्हल्स तिकिटांचे दर गगनाला, प्रवाशांच्या खिशाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:02 IST2026-01-21T11:01:24+5:302026-01-21T11:02:30+5:30
- दिल्लीसाठी सहा हजारांत मिळणारे तिकीट १२ ते १५ हजार रुपयाला

सलग सुट्यांमुळे विमान व ट्रॅव्हल्स तिकिटांचे दर गगनाला, प्रवाशांच्या खिशाला फटका
पुणे : प्रजासत्ताक दिन सोमवारी आल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाल्याने देशांतर्गत विमान प्रवासाला मोठी मागणी वाढली असून, त्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरांवर झाला आहे. त्याचबरोबर पुण्यातून विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे तिकीटदेखील वाढले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुटीसह शनिवार ते सोमवार अशी सलग तीन दिवस सुटी मिळाल्याने पर्यटक, कुटुंबे पर्यटनासाठी बाहेर जात आहेत. परिणामी, प्रमुख शहरांदरम्यानच्या विमान तिकिटासह ट्रॅव्हल्सचे दर वाढल्याचे दिसून येत आहे.
प्रजासत्ताक दिनाला संचलन पाहण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या विमान तिकिटाचे दर शनिवार, रविवारी दुप्पट वाढले आहेत. याशिवाय मुंबई-दिल्ली, पुणे-बंगळुरू, मुंबई-गोवा, पुणे-कोलकाता अशा मार्गांवर तिकिटांचे दर सर्वाधिक वाढले आहेत. इतर दिवशी ४ ते ६ हजार रुपयांत मिळणारी तिकिटे या कालावधीत १० ते १५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. महत्त्वाच्या वेळांच्या फ्लाइट्ससाठी तर दर आणखी जास्त वाढले आहेत. दरवाढीमुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेकडे मोर्चा वळवला असून, काहींनी प्रवासाची तारीख बदलणे पसंत केले आहे. मात्र, सुटीचा कालावधी मर्यादित असल्याने अनेकांना वाढीव तिकीट दर मोजूनही प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, विमान कंपन्यांकडून ही दरवाढ हंगामी आणि मागणीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. सुटीपूर्वी किमान दोन ते तीन आठवडे आधी बुकिंग केल्यास तुलनेने स्वस्त दर मिळू शकतात. परंतु, ऐनवेळी जाणाऱ्यांना तिकीट दर वाढल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका आहे.
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या सुसाट :
सलग सुट्यांमुळे कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले नागरिक गावी जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे या काळात प्रवाशांची गर्दी होते. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून शनिवार, रविवारी पुण्यातून मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देशात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे तिकीट दर दीडपट वाढविले आहेत. त्याचा प्रवाशांना फटका बसत आहे. शिवाय रेल्वेचे बुकिंग दोन महिने फुल्ल असल्याने ऐनवेळी रेल्वेला तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. याच संधीचा फायदा खासगी कंपन्यांकडून घेण्यात येत आहे.
रेल्वे फुल्ल :
रेल्वेचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वी करण्याची सुविधा आहे. त्यामुळे हजारो प्रवासी अगोदर आरक्षण करून रेल्वेने प्रवास करतात. परंतु, सुटीच्या काळात ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना तिकीट मिळत नाही. अगोदर आरक्षण करण्याची सुविधा असल्याने वेटिंग लिस्ट वाढले आहे. सलग सुट्या असल्याने रेल्वेला आणखी गर्दी वाढणार आहे. काही मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून विशेष जादा रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या हवाई दलाच्या हवाई कसरतींसाठी, दिल्ली हवाई क्षेत्रामध्ये मर्यादित कालावधीसाठी विमान उड्डाणावरती हवाई दलाने बंदी घातल्याने, विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. अल्प कालावधीत जास्त मागणी निर्माण झाल्याने ‘डायनॅमिक प्रायसिंग’नुसार विमान कंपन्यांनी दर वाढवले. याशिवाय दिल्ली, गोवा, जयपूर, वाराणसी, उदयपूर यांसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या फ्लाइट्सना विशेष मागणी आहे. -सिद्धार्थ कापसे, एजन्सीधारक