वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 16:56 IST2019-06-17T16:55:06+5:302019-06-17T16:56:10+5:30
ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकार्यालयासमाेर घंटानाद आंदाेलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद
पुणे : ईव्हीएमबाबत सातत्याने अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या असल्याने ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा घाेषणा देत वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर घंटानाद आंदाेलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचे पत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शेकडाे कार्यकर्ते, महिला युवक उपस्थित हाेते.
देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचे वातावरण आहे .लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते .त्यामुळे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे "घंटानाद आंदोलन" करण्यात आले. यावेळी" ईव्हीएम हटाव देश बचाओ " अशा घाेषणा देण्यात आल्या. भारीपचे पुणे शहराध्यक्ष व वंचितचे समनव्यक अतुल बहुले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड ,लष्कर ए भीमा ,रिपब्लिकन परिवर्तन आघाडी यासह विविध संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला .
या आंदोलनात पुणे शहरातील आठही मतदारसंघातील युवक ,महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते . लोकशाही विरोधी ईव्हीएम मुळे मतदार व जनतेची फसवणूक झाली आहे असा आराेप करत ईव्हीएमचा निषेध शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केला.