वारजे : आईचे वय ८७ वर्षे, धाकटा मुलगा काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडला हे त्यांच्या वयस्कर आईला सांगायचे कसे, आता जगदाळे कुटुंबीयांना हा प्रश्न पडला आहे. ही घटना घडली तेव्हा ८७ वर्षांच्या माणिकबाई एकनाथ जगदाळे या हडपसर येथे नातेवाईकांकडे वास्तव्यास गेल्या होत्या. बुधवारी (दि.२३) त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना काश्मीरमध्ये संतोषचा अपघात होऊन त्याला दुखापत झाली आहे असे सांगून हडपसरहून घरी बोलावून घेतले. घरी येताच खाली पोलिस व इतर नागरिकांचा येरझारा पाहून आईला शंका वाटली व तुम्ही सर्वजण मिळून काही तरी लपवत आहात. माझ्या मुलाला काही बरेवाईट झाले तर मी देखील जीव देईन या शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिला.
तेव्हा त्यांची दुसरी मुले अजय व अविनाश जगदाळे तसेच कौटुंबिक मित्र रवींद्र पाटणे यांनी आईला समजावले की, काश्मीरमध्ये धुसफूस चालू असून अपघातात संतोषला थोडे लागले आहे. त्याच्यासह त्याची पत्नी व मुलगी सुखरूप असून रात्री सगळे येणार आहे. सरकारकडून प्रत्येक पर्यटकाच्या घरी पोलिस जाऊन विचारपूस करीत आहेत. अशी समजूत घातल्यावर व संध्याकाळी त्यांच्या मुळगाव साताराहून काही नातेवाईक आल्याने त्यांच्याशी बोलताना आई काहीशा निश्चिंत झाल्या होत्या. असे असले तरी सकाळी पार्थिव आल्यावर आईला कसे समजवायचे हा गहन प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे.
वैष्णोदेवीचा मार्ग बदलला आणि काळ आला : काही मित्रांच्या म्हणण्यानुसार जगदाळे व गणबोटे कुटुंबीय एकत्रितरीत्या काश्मीरला गेले होते. त्यांना वैष्णोदेवीला जायचे होते. पण तेथे झालेल्या ढगफुटी व खराब हवामानामुळे त्यांनी वैष्णोदेवीला न जाता मार्ग बदलून पहलगामला जाण्याचे ठरवले व तेथेच गेल्यावर ही दुर्दैवी घटना घडली.
वडील सरकारी सेवेत, आई शेंगदाणे- फरसाणच्या व्यवसायात
जगदाळे कुटुंबीय पूर्वी रविवार पेठेत राहायला होते. संतोष यांचे वडील एकनाथ जगदाळे हे खडकी येथील दारुगोळा कारखान्यात कामाला होते. संतोष यांचे बालपण रविवार पेठेत गेले होते. त्यांच्या आई पूर्वी फुटाणे व फरसाण विक्रीचा छोटासा व्यवसाय करत होत्या. कामावरून आल्यावर वडील देखील आईला मदत करत असे. संतोष यांना फरसाण विक्रीचे बाळकडू घरातून आईकडूनच मिळाले होते. निवृत्तीनंतर वडिलांचे काही वर्षांनी निधन झाले होते.