नाट्यगृहांच्या दुरवस्थेनंतर आता शहरातील शासकीय कार्यालयांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:32 IST2025-06-08T17:31:24+5:302025-06-08T17:32:07+5:30

- शहरात साथीच्या आजारांना सरकारी कार्यालयांतील अस्वच्छता घालतेय खतपाणी

After the poor condition of theatres, now the government offices in the city are also in a state of unsanitary conditions; Unsanitary conditions in government offices are fueling epidemics in the city | नाट्यगृहांच्या दुरवस्थेनंतर आता शहरातील शासकीय कार्यालयांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य

नाट्यगृहांच्या दुरवस्थेनंतर आता शहरातील शासकीय कार्यालयांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य

- संदीप पिंगळे  

पुणे :
शहरातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी शासकीय मध्यवर्ती इमारत, विधान भवनासमोरील नवी प्रशासकीय इमारत तसेच राष्ट्रीय हरित प्राधिकरण परिसरात साचलेला कचरा व दुर्गंधींमुळे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐन पावसाळ्यातच शासकीय कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचल्याने शहरात रोगराई पसरविण्यास सरकारी कार्यालयेच हातभार लावत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे आरोग्य विभाग पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग पसरू नयेत, यासाठी घरात व परिसरात अडगळीच्या वस्तू न ठेवण्याच्या सूचना देतात. मात्र त्यास सरकारी कार्यालयेच हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. नागरिकांसह याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

शासकीय कार्यालयांतील स्वच्छतेसाठी वर्षाकाठी लाखो रुपयांच्या निविदा काढून ठेकेदारांना दिल्या जातात. ठेकेदार स्वच्छता कर्मचारी नेमतात. परंतु ठेकेदाराकडून ठेका घेताना कागदावर दर्शविलेले कर्मचारी आणि प्रत्यक्षात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या यात जमीन आसमानाचा फरक दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने न पुरविता कामे करवून घेतली जात असल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


मध्यवर्ती इमारत परिसरात कचऱ्याचे ढिगारे

शासकीय मध्यवर्ती इमारत आवारातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस अनेक दिवसांपासून निकामी झालेल्या रिकाम्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
मध्यवर्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील आरोग्य सहसंचालकांच्या
कार्यालयाशेजारी स्वच्छतागृहाबाहेर कंटेनरच्या बाहेर कचरा फेकलेला दिसत आहे.
मध्यवर्ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कृषी सहसंचालकांच्या कार्यालयाशेजारील स्वच्छतागृहाबाहेरील कचऱ्याने ओसंडून वाहणारे कंटेनर आहेत.


राष्ट्रीय हरित प्राधिकरण इमारतीमध्ये दुर्गंधी

-विधान भवनसमोरील राष्ट्रीय हरित प्राधिकरण इमारतीशेजारील जागेतील कचऱ्याचे ढिगारे.

-राष्ट्रीय हरित प्राधिकरण इमारतीच्या मागील बाजूला पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या लिफ्टकडे जाणाऱ्या मार्गाशेजारी पडून असलेला राडारोडा.

टेरेस, बाल्कनी जुन्या पडीक साहित्याने गच्च
मध्यवर्ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेस, बाल्कनीत ठेवण्यात आलेल्या मोडक्या खुर्च्छा. साठलेली रद्दी यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून सध्याच्या पावसामुळे सर्वत्र कुबट वास येत आहे.

 

Web Title: After the poor condition of theatres, now the government offices in the city are also in a state of unsanitary conditions; Unsanitary conditions in government offices are fueling epidemics in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.