तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 20:28 IST2025-04-16T20:07:50+5:302025-04-16T20:28:15+5:30
हॉस्पिटलमध्ये ३१ मार्च रोजी तनिषा भिसे या महिलेला दाखल करण्यात आले होते.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
पुणे - शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असतानाच, आता सूर्या, इंदिरा आणि मणिपाल या खासगी हॉस्पिटल्सवरही संशयाचे सावट गडद झाले आहे. पुणे पोलिसांनी या चारही रुग्णालयांची चौकशी करून प्राथमिक अहवाल ससून रुग्णालयाकडे पाठवला आहे. ससून रुग्णालयाचा अंतिम अहवाल आल्यानंतर पुणे पोलिस कारवाईची पुढील दिशा ठरवणार आहेत.
सूर्या हॉस्पिटलमध्ये ३१ मार्च रोजी तनिषा भिसे या महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सूर्या हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी सुविधा उपलब्ध नसतानाही, तिथे रुग्णाला कसे दाखल करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सूर्या हॉस्पिटलही चौकशीच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तत्पूर्वी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरणात अडकलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखेने ठाम पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, या चौकशीत डॉ. घैसास निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वास आयएमएने व्यक्त केला आहे. सरकारकडून अहवालाच्या आधारे दोष निश्चित केला जाणार असला तरी, डॉ. घैसास यांच्यावर अन्याय होत असून त्यांना आरोपी ठरवणे योग्य नाही, असे आयएमएने स्पष्ट केले आहे. त्यांनी केवळ वैद्यकीय कर्तव्य पार पाडले असून, त्यांच्यावरील आरोप हे अन्यायकारक असल्याचे मत आयएमएने मांडले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असून, तो अहवाल आल्यानंतर पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.