गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेनंतर शहरातील पब, रेस्टॉरंट चालकांसाठी सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:36 IST2025-12-10T10:35:14+5:302025-12-10T10:36:15+5:30
नव वर्षापर्यंत ती आणखी वाढते. गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टाॅरंट, बार, तसेच उपहारगृह चालकांसाठी आपत्कालीन उपाययोजना, तसेच सुरक्षेसंदर्भात सूचना दलातर्फे देण्यात येणार

गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेनंतर शहरातील पब, रेस्टॉरंट चालकांसाठी सूचना
पुणे : गोव्यातील नाईट क्लबमध्ये घडलेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अग्निशमन दलाने शहरातील पब, रेस्टाॅरंट, उपहारगृह चालकांना सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहेत.
ख्रिसमस नाताळपासून शहरातदेखील विविध पब, रेस्टाॅरंट, उपहारगृहांमध्ये गर्दी होण्यास सुरुवात होते. नव वर्षापर्यंत ती आणखी वाढते. गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टाॅरंट, बार, तसेच उपहारगृह चालकांसाठी आपत्कालीन उपाययोजना, तसेच सुरक्षेसंदर्भात सूचना दलातर्फे देण्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसांत विविध सूचनांचे परिपत्रक संबंधितांना पाठविण्यात येईल, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.
शहरातील अनेक पब, रेस्टाॅरंट, बारमध्ये प्रवेश करण्यासाठी, तसेच बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गांची पाहणी करणे गरजेचे आहे. आग किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास ग्राहकांना त्वरित बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पब, रेस्टाॅरंट, बारमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे का नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्वरित केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत पब, रेस्टाॅरंट, बार चालकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहोचेपर्यंत मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित करायला हवे. याबाबत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही अग्निशमन दलाकडून दिले जाईल. आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सराव करणे गरजेचे आहे. पब, बारमधील कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही गरजेचे आहे, असे पोटफोडे यांनी नमूद केले.
गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पब, रेस्टॉरंट चालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी करणे गरजेचे आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित बाहेर पडण्यासाठी ग्राहकांना मार्ग उपलब्ध करून द्यायला हवा. - सोमय मुंडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४