मुलीचे केंद्रीय विद्यालय शाळेत ऍडमिशन करून देतो; युवकाची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 5, 2024 15:16 IST2024-05-05T15:16:45+5:302024-05-05T15:16:57+5:30
आरोपीने अनेक लोकांच्या मुलांच्या ऍडमिशनसाठी तसेच वेगवेगळ्या कामासाठी पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक केली

मुलीचे केंद्रीय विद्यालय शाळेत ऍडमिशन करून देतो; युवकाची फसवणूक
पुणे: मुलीचे खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळवून देतो, असे सांगून चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अजित रामकृष्ण घाटपांडे (रा. कात्रज) याच्याविरोधात वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा प्रकार २८ मार्च २०२२ ते १७ जुलै २०२ यादरम्यानच्या काळात वारजेतील हॉटेल स्वर्ण येथे घडला आहे. याबाबत रोहित विजय कुलकर्णी (वय- ४३, रा. एनडीए रस्ता) यांनी शनिवारी (दि. ४) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अजित घाटपांडे याने वारजे येथील स्वर्ण हॉटेलमध्ये फिर्यादीची भेट घेऊन मुलीला खडकवासला येथील केंद्रीय विद्यालय शाळेत इयत्ता पहिलीला ऍडमिशन मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर ऍडमिशन घेण्याच्या बहाण्याने १ लाख ४३ हजार रुपये घेतले. मात्र पैसे दिल्यानंतरही आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचे ऍडमिशन करून दिले नाही. तसेच याबाबत विचारणा केली असता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून फिर्यादींनी पैसे परत दे असे सांगितल्यावर आरोपीने स्वतः आत्महत्या करेल अशी धमकी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी अजित याने इतर अनेक लोकांच्या मुलांच्या ऍडमिशनसाठी तसेच वेगवेगळ्या कामासाठी पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक केली आहे. म्हणून अजित घाटपांडे याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नांद्रे करत आहेत.