Action taken on started water parks in drought conditions: Collector | दुष्काळजन्य परिस्थितीत सुरु असलेल्या वॉटरपार्कवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी 
दुष्काळजन्य परिस्थितीत सुरु असलेल्या वॉटरपार्कवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी 

ठळक मुद्देदुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय टँकरवर २८ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार जिल्ह्याचा  ६५ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार

पुणे : पाऊस लांबण्याचा असलेला अंदाज आणि जिल्ह्यातील धरणांनी गाठलेला तळ, या पार्श्वभूमीवर दुष्काळ घोषित करण्यात असताना सुरु असलेल्या वॉटर पार्कवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात मावळ वगळता अन्य तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
  राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सात तालुके होते. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच तालुक्यांमधील १९ मंडलांचा समावेश दुष्काळी भागात केला आहे. जिल्ह्यात पुणे शहरासह १४ तालुके आहेत. शहर वगळता जिल्ह्यात १३ तालुके आहेत. त्यांपैकी मावळ तालुका वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे. जिल्ह्याचा  ६५ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्यापैकी टँकरवर २८ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबरोबरच खासगी विहिरींमधून पाणी विक्री करता येणार नसल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील खासगी विहिरींमधून पाण्याची विक्री होत असल्यास, संबंधित विहीर अधिग्रहित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. धायरी भागातील एक खासगी विहीर ताब्यात घेण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेकडून संबंधित ठिकाणी शासकीय दराने पाणी पुरवठा केला जात आहे.
--- 
जिल्ह्यात मावळ तालुक्यात सर्वाधिक वॉटर पार्क आहेत. हा तालुका दुष्काळी म्हणून घोषित केलेला नाही. मावळ सोडून इतर ठिकाणी बेकायदा वॉटर पार्क सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच टंचाईग्रस्त भागातील वॉटर पार्क सुरू असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी


Web Title: Action taken on started water parks in drought conditions: Collector
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.