अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाई थंडावली; महापालिकेकडून राजकीय फ्लेक्सबाजीला अभय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:44 IST2025-11-01T11:40:43+5:302025-11-01T11:44:53+5:30
राजकीय दबावामुळे प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असून या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते.

अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाई थंडावली; महापालिकेकडून राजकीय फ्लेक्सबाजीला अभय
पुणे : शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिकेने दिवाळीपूर्वी शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची प्रभावी मोहीम हाती घेतली. मात्र, दिवाळीमध्ये आणि त्यानंतर ही कारवाई थंडावल्याने शहरात सर्वत्र फ्लेक्स दिसू लागले आहेत. यामध्ये सर्वाधिक फ्लेक्स राजकीय नेत्यांचे असल्याने महापालिकेकडून राजकीय फ्लेक्सबाजीला अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरातील रस्त्यांवरील विद्युत खांब, पथदिवे, सिग्नलचे खांब, चाैकांसह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभारले जातात. हे फ्लेक्स विविध कार्यक्रमांचे आयाेजन, वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा यासाठी उभारले जातात. अनेक ठिकाणी हे फ्लेक्स धाेकादायक पद्धतीने उभारले जातात. आकाशचिन्ह विभागाकडून व अतिक्रमण विभागाकडून अशा अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाते. मात्र, राजकीय दबावामुळे प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी दिवाळीपूर्वी शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात सर्वत्र प्रभावीपणे कारवाई मोहीम राबवण्यात आली. अनधिकृत फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले; मात्र यातून राजकीय फ्लेक्सकडे दुर्लक्ष केले गेले. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये केवळ खासगी कंपन्यांना लक्ष्य केले गेले. एकाही राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल केला गेला नाही; मात्र गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे राजकीय नेतेही धास्तावले होते. फ्लेक्स लावताना इतरवेळी कोणालाही न जुमानणारे नेते फ्लेक्स लावण्यापूर्वी आपल्या भागातील अधिकाऱ्यांच्या कानावर घालत होते.
दिवाळीमध्ये वाद विवाद नको आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने दिवाळीमध्ये फ्लेक्सवरील कारवाई थांबवली होती. दिवाळीनंतर ही कारवाई पुन्हा सुरू होणे गरजेचे होते. मात्र, ही कारवाई अद्यापही सुरू झालेली दिसत नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत.
फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक कधी ?
‘‘फ्लेक्स बाजी करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काही ठाेस पावले उचलण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडून फ्लेक्सची प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांची एक बैठक बाेलावण्यात येणार होती. या बैठकीत प्रत्येक फ्लेक्सवर प्रिंटरचे नाव टाकणे बंधनकारक करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार होता; मात्र अद्याप व्यावसायिकांची बैठक बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बैठक नेमकी केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.