धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:07 IST2025-10-25T15:07:04+5:302025-10-25T15:07:47+5:30
धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार असून त्यांना भेटायला पुण्याला जाणार आहे, त्यांनी संयम बाळगला पाहिजे

धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल
पुणे: माजी आमदार रवींद्र धंगेकर भाजप नेत्यांवर टीका करतात, म्हणून काही जण धंगेकरांना पक्षातून काढा, अशी मागणी करत आहेत. धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर बाकीच्यांचे काय? नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? असा सवाल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित करत एकप्रकारे धंगेकर यांची पाठराखणच केली आहे.
मागील काही दिवसांपासून माजी आमदार रवींद्र धंगेकर हे नीलेश घायवळ प्रकरणावरून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच जैन बोर्डिंग जागेच्या वादग्रस्त व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य करत आहेत. धंगेकर दररोज वेगवेगळे आरोप करत आहेत. यामुळे शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्यावर कारवाई करावी, त्यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे मंत्री गणेश नाईक हे गेल्या काही दिवसांपासून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.
या पार्श्वभूमीवर उदय सामंत म्हणाले, धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे. वेळ आली तर त्यांना भेटायला पुण्याला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे. तशाचप्रकारे महायुतीमधील बाकीच्या नेत्यांनीही संयम बाळगायला हवा. गणेश नाईकही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. मग धंगेकर यांना जो निकष आहे, तोच बाकीच्यांना हवा, असेही सामंत म्हणाले.