Pune: घरगुती हिंसाचाराचा गुन्हा मागे घे म्हणत पत्नीवर टाकले ऍसिड, हडपसरमधील घटना
By नितीश गोवंडे | Updated: November 2, 2023 16:13 IST2023-11-02T16:13:00+5:302023-11-02T16:13:29+5:30
३५ वर्षीय नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune: घरगुती हिंसाचाराचा गुन्हा मागे घे म्हणत पत्नीवर टाकले ऍसिड, हडपसरमधील घटना
पुणे : गावाकडे दाखल केलेला घरगुती हिंसाचारचा गुन्हा मागे घे म्हणत पतीने पत्नीवर ऍसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर भागात घडला. या ऍसिड हल्लयात पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३५ वर्षीय नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे लातूर जिल्ह्यातील असणारे हे दाम्पत्य पटत नसल्याने २०१७ पासून वेगळे राहतात. यांना ७ आणि ५ वर्षांच्या दोन मुली आहेत. पती त्रास देत असल्याने पत्नीने गावाकडे पतीविरोधात घरगुती हिंसाचारचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला या भेकराईनगर येथील एका रुग्णालयात रिशेप्शनिस्ट म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी या पीडित महिलेचा पती त्या काम करत असणाऱ्या रुग्णालयात आला, आमच्या वरील केस मागे घेत नाही, थांब तुला दाखवतो असे म्हणून फिर्यादी महिलेच्या अंगावर ऍसिड टाकून गंभीर जखमी केले.
फिर्यादी महिलेवर हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी पती फरार असून हडपसर पोलिस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.