Accused arrested for four years; Detained from the border of Nepal | चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीस अटक ; नेपाळच्या सीमारेषेवरून घेतले ताब्यात

चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीस अटक ; नेपाळच्या सीमारेषेवरून घेतले ताब्यात

धायरी: लग्नानंतर हुंड्यामध्ये मोटार सायकलची मागणी करून पत्नीला मानसिक व शारीरिक छळ दिल्याने तिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या तसेच चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस सिंहगड रस्ता पोलिसांनी नेपाळच्या सीमेरेषेवरून अटक केली आहे.

सलीम तबारक अन्सारी (वय: ३०, रा. जंगल बेलवा, पडरौना ठाणे, कुशीनगर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत समिना खातून बनाम सलीम अन्सारी (उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.    

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी यांची मुलगी नसीमाबरोबर लग्न झाल्यावर दोन -तीन महिन्यानंतर आरोपी हुंड्यामध्ये मोटारसायकलची मागणी करू लागला.आरोपी पती हा पत्नी नसीमाला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने फिर्यादीने आपल्या मुलीला माहेरी नेले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन गावातील लोकांच्या मध्यस्थीने पुन्हा नसिमाला आणले. त्यानंतर मात्र १४ एप्रिल २०१६ रोजी नसीमाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे समजले. याबाबत उत्तर प्रदेश येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. मात्र नसीमाने नऱ्हे, पुणे येथे गळफास घेतल्याने हा गुन्हा तपासासाठी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, पोलीस शिपाई मयूर पतंगे, पोलीस शिपाई संदीप पवार यांनी उत्तरप्रदेश येथे जाऊन तब्बल बारा दिवस तांत्रिक मदतीच्या साहाय्याने तपास करून आरोपीस नेपाळच्या सीमारेषेवरून ताब्यात घेतले. आरोपी हा दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना सिंहगड रस्ता पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Accused arrested for four years; Detained from the border of Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.