खून, मोका अन् अत्याचाराच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:57 IST2025-08-02T10:56:36+5:302025-08-02T10:57:46+5:30

विशाल भोले याने तिला लग्नाचे आमिष दाखवून खोटे प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने लग्न न झाल्याचे खोटे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

Accused absconding for two years in murder, rape and torture cases arrested | खून, मोका अन् अत्याचाराच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

खून, मोका अन् अत्याचाराच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

पुणे - खून, मोका आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. विशाल लक्ष्मण भोले (वय 32, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार, विशाल भोले याने तिला लग्नाचे आमिष दाखवून खोटे प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने लग्न न झाल्याचे खोटे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या काळात पीडित तरुणी दोन वेळा गर्भवती राहिली. मात्र, विशालने तिची कोणतीही संमती न घेता तिचे दोन वेळा गर्भपात घडवून आणले.

पुढे लग्नाविषयी विचारणा केली असता, विशालने तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. त्यामुळे तरुणीने त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही विशालने तिच्यावर दबाव टाकत पुन्हा संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विशाल भोले फरार झाला होता.

खून आणि मोक्का गुन्ह्यातही आरोपी फरार

विशाल भोले याच्यावर फक्त बलात्कारच नव्हे, तर 2023 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रकरणातही गुन्हा दाखल होता. त्यात त्याच्यावर मोक्का (MCOCA) लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो पोलिसांच्या हाताला लागला नव्हता.

धायरीत लपून बसलेला आरोपी अखेर गजाआड

बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून विशाल भोले हा पुण्याच्या धायरी परिसरात लपून बसल्याचे समोर आले. त्या आधारे पोलिसांनी काटेकोर सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, प्रदीप शितोळे, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे यांच्या पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली.

पुढील तपास सुरू

सध्या विशाल भोले याच्यावर खुनासोबतच बलात्कार, जबरदस्ती, गर्भपात, धमकी आणि मोक्कासारखे गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आणखी काही गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Accused absconding for two years in murder, rape and torture cases arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.