चाकणला तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात; ३ जण ठार, २ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:04 IST2021-04-26T19:02:46+5:302021-04-26T19:04:42+5:30
शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरची राजगुरूनगरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक

चाकणला तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात; ३ जण ठार, २ जखमी
चाकण : येथील तळेगाव चौकात आज ( दि.२६) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सिलेंरो कार, स्कॉर्पिओ व कंटेनर या तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात सिलेंरो कार मधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.यातील दोन युवक सख्खे चुलत भाऊ असून वाकी बुद्रुक व एक जण कडूस ( ता.खेड ) येथील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल संपत सोनवणे ( वय.२७ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अक्षय मारुती सोनवणे ( वय.२३ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अविनाश रोहिदास अरगडे ( वय.२८ वर्षे,रा.कडूस,ता.खेड ) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.यातील अक्षय सोनवणे यांचा अपघात झालेल्या तळेगाव चौकात वेदिका चाय या नावाने हॉटेल व्यवसाय करत होता.
शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या ( एम.एच.०४ एफ यु ०१९१ ) या कंटेनरची राजगुरूनगर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसल्याने स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेंरो कारला भरधाव स्कॉर्पिओ गाडीचा अत्यंत वेगाने जोराची धडक बसली,या भीषण अपघातात तीन युवकांचा जागेवरच अंत झाला.तर स्कॉर्पिओ गाडीतील दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चाकणपोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.