मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अत्याचार
By नितीश गोवंडे | Updated: December 17, 2023 17:55 IST2023-12-17T17:54:56+5:302023-12-17T17:55:26+5:30
महिलेने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बंडु रणखांबे याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अत्याचार
पुणे : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेला घरातून बाहेर बोलवत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बंडु रनखांबे याच्याविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. १५) रात्री आठच्या सुमारास वाघोली येथील राम मंदिराजवळ घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी महिला घरात टीव्ही पाहात बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी बंडु हा त्यांच्या घरासमोर आला. त्याने ‘मी मूल होण्याचे औषध सांगतो’ असे म्हणून फिर्यादी यांना घरातून बाहेर बोलवून घेतले. त्यानंतर महिलेला बिल्डिंगच्या सार्वजनिक शौचालयाजवळ नेऊन त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. यानंतर महिलेने आरोपीच्या ताब्यातून सुटका करुन घेत तेथून निघून गेल्या. पीडित महिलेने शनिवारी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बंडु रणखांबे याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार शिवले करत आहेत.