Pune: शनिवारवाड्याजवळ बेवारस पिशवी, बॉम्बच्या अफवा; वाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 17:02 IST2024-06-01T17:00:01+5:302024-06-01T17:02:00+5:30
बाॅम्बच्या अफवेमुळे शनिवारवाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता....

Pune: शनिवारवाड्याजवळ बेवारस पिशवी, बॉम्बच्या अफवा; वाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद
पुणे : शनिवारवाड्यात बेवारस पिशवी सापडल्यानंतर बाॅम्बच्या अफवेने शनिवारी (दि. १) घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, तसेच बाॅम्बशोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. बाॅम्बच्या अफवेमुळे शनिवारवाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.
शनिवारवाडा परिसरास सकाळी १० वाजेच्या सुमारास एक पिशवी सापडली. बेवारस पिशवी सापडल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांची शनिवारवाड्यात गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाॅम्ब शाेधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बाॅम्बशोधक पथकातील तज्ज्ञांनी पिशवीची पाहणी केली.
तपासणीत या पिशवीत कुठलीही बाॅम्बसदृश संशयास्पद वस्तू सापडली नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, बेवारस अवस्थेत सापडलेली पिशवी पर्यटकाची असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बाॅम्बच्या अफवेनंतर शनिवारवाडा काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.