संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

By निलेश राऊत | Published: February 29, 2024 07:27 PM2024-02-29T19:27:00+5:302024-02-29T19:30:40+5:30

जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले

Aamir Khan will implement group farming program in entire Maharashtra in next two years | संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

संपूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात गट शेतीचा कार्यक्रम राबविणार - आमिर खान

पुणे : कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात केली व त्याला शेतकऱ्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले.

पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी संपन्न झाला. त्यावेळी खान बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.

खान म्हणाले, पानी फाऊंडेशनची सुरूवात २०१६ मध्ये झाली. तेव्हा प्रारंभी चार वर्षे आम्ही जल संधारणावर काम केले. तीन तालुक्यांपासून सुरू झालेले हे काम चार वर्षात ७५ तालुक्यांपर्यंत पोहचले. जगात काही अशक्य नाही हे जल संधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील गावांनी याकाळात दाखवून दिले. आता संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचे लक्ष्य फाउंडेशनने बाळगले असून, या माध्यमातून शेकडो शेतकरी - उद्योजक घडवायचे असल्याचे ते म्हणाले.

विलास शिंदे यांनी, गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे हे केवळ एकीच्या माध्यमातून शक्य असल्याचे सांगितले. शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा आहे तसेच तो व्यावसायिक आहे. आता आपली स्पर्धा ही जागतिक पातळीवर असून, गट शेतीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो असेही ते म्हणाले.
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अभिनेते जॅकी श्रॉफ, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

महिलांचा सहभाग आनंददायक : देवेंद्र फडणवीस

पुरस्कार वितरण सोहळण्यास उपस्थित राहू न शकलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेश पाठवून फार्मर कपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. फार्मर कापच्या निमित्ताने सरकारी योजनांना चळवळीचे रूप आले आहे. फार्मर कपमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे याचा मला आनंद आहे. या महिलांसाठी फाउंडेशनने विशेष पुरस्कार ठेवले आहेत ही कौतुकाची बाब आहे.

Web Title: Aamir Khan will implement group farming program in entire Maharashtra in next two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.