27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:56 PM2024-05-29T21:56:48+5:302024-05-29T21:58:25+5:30

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. 100 किमी लांबीचा पूल झाला असून, पुढील 250 किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत.

27515 kg of explosives used; Mumbai-Ahmedabad bullet train tunnel ready in just six months | 27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार

27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार

Bullet Train India : भारतातील पहिली बुलेट ट्रेनमुंबई-अहमदाबाद, या दोन शहरादरम्यान धावणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये 100 किमी लांबीचा पूल पूर्ण झाला असून, पुढील 250 किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या 6 महिन्यांत नवी मुंबईतील 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घणसोली येथे अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा (ADIT) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळेल.

पीएम मोदींनी केला शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. या प्रकल्पाला मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर असे नाव देण्यात आले आहे. बुलेट ट्रेनसाठी बोगद्याचे खोदकाम 6 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाले होते. विशेष म्हणजे, या बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत तब्बल 1.08 लाख कोटी रुपये आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला बुलेट ट्रेनमध्ये 750 लोक बसू शकतील, नंतर 1200 लोकांसाठी 16 डबे जोडले ताली.

508 किमीचा प्रवास 3 तासात पूर्ण होणार 
मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन 508 ​​किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन तासात पूर्ण करेल. सध्या सामान्य ट्रेनने मुंबई-अहमदाबाद हे अंतर 7-8 तासांचे आहे. ट्रेनचा सरासरी वेग 254 किमी/तास असेल. तसेच, बुलेट ट्रेनच्या मार्गावर 12 स्थानके असतील. यात मुंबई, ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती आहेत. मुंबई स्टेशन भूमिगत असेल. 

खोदकामासाठी 27515 किलो स्फोटकांचा वापर
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ADIT 26 मीटर झुकलेला असून, याला बनवण्यासाठी 27515 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. 214 वेळा ब्लास्टिंग करुन हा बोगदा तयार करण्यात आला आहे. यासाठी नॉन-इलेक्ट्रिक डिटोनेटर्सचाही वापर करण्यात आला. यावेळी आग लागण्याची शक्यता टाळण्यासाठी विनाविद्युत उपकरणे लावण्यात आली. कर्मचारी आणि कामगारांसह एकूण 100 लोक या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत. 

बोगद्याचा 7 किमीचा भाग समुद्राखालून जाणार 
या प्रकल्पात एकूण 21 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यामध्ये बोअरिंग मशिनच्या साह्याने 16 किलोमीटर खोदकाम करण्यात येईल, तर 5 किलोमीटरचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंगद्वारे बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे, या बोगद्याचा सुमारे सात किलोमीटर भाग ठाणे खाडीतील समुद्राखालून जाणार आहे. सध्या बीकेसी, विक्रोळी आणि घणसोलीजवळ सावली येथे 3 शाफ्टचे बांधकाम सुरू आहे. हे शाफ्ट टनेल बोरिंग मशीन्स (TBM) वापरुन 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात मदत करतील.

Web Title: 27515 kg of explosives used; Mumbai-Ahmedabad bullet train tunnel ready in just six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.