रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ घेऊन घरी जाताना काळाचा घाला, हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:20 IST2023-10-09T12:20:10+5:302023-10-09T12:20:46+5:30
मायलेकाचा अपघात: आई गंभीर जखमी...

रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ घेऊन घरी जाताना काळाचा घाला, हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू
बारामती (पुणे) :बारामती शहरात खासगी रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ घेऊन घरी परतणाऱ्या दुचाकीवरील मायलेकाला हायवाने जोरदार धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची आई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी (दि.७ ) सायंकाळच्या सुमारास प्रशासकीय भवनासमोर रिंग रोडवर हा अपघात झाला. तेजस विजय कासवे (वय २१ वर्ष) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्या आहेत. तेजस हा दोन दिवसांपूर्वीच आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी बारामती हॉस्पिटल येथे भरती झाला होता. त्याच्या नाकावर शत्रक्रिया झाल्यावर आवश्यक ते उपचार करून, तेजस शनिवारी रुग्णालयातून आईसह आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला होता.
यावेळी भरधाव वेगात आलेल्या हायवाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये तेजसचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तेजस अत्यंत हुशार व सालस विद्यार्थी होता. तेजस सहा वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरपले. आईने दोन भावांना खडतर परिस्थितीत दोघांचा सांभाळ केला. तेजस हा पुण्यातील व्हीआयआयटी ‘बीटेक‘च्या अंतिम वर्षात शिकत होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.