ऑफिसमधील सहकारी बोलत असल्याचे भासवून महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 18, 2024 18:36 IST2024-01-18T18:32:59+5:302024-01-18T18:36:22+5:30
ऑफिसमधील सहकारी नेहमी अशा स्वरूपाचे काम सांगत असल्याने फिर्यादी महिलेचा विश्वास बसला

ऑफिसमधील सहकारी बोलत असल्याचे भासवून महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा
पुणे: पुण्यातील आयटी कन्सल्टन्ट कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला ऑफिसमधील सहकारी बोलत असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बोट क्लब रोड परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय गुरुवारी (दि. १७) महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना ऑफिसचे सहकार्याचे नाव दिसत असल्यासारख्या नावाने मेल आला. मेलमध्ये एक मोबाईल क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले गेले होते. त्यावर संपर्क केला असता ऑफिसमधील काही कामगारांना गिफ्ट व्हाउचर्स द्यायचे आहेत त्यासाठी ऍपल कोड विकत घेऊन पाहिजे आहे. ते तू विकत घेऊन मला दे. मी तुला पैसे ट्रान्स्फर करेल असे सांगितले. ऑफिसमधील सहकारी नेहमी अशा स्वरूपाचे काम सांगत असल्याने फिर्यादी महिलेचा विश्वास बसला. सांगितल्याप्रमाणे महिलेने प्रत्येकी ५ हजार रुपयांचे एकूण १८३ अँपल कोड विकत घेऊन दिले. त्यानंतर सहकाऱ्याशी संवाद झाला असता असे कोणतेही काम मी सांगितले नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.