हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:03 IST2025-03-05T10:02:48+5:302025-03-05T10:03:01+5:30
सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागला

हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू
पुणे : हडपसर येथील मांजरी बुद्रुकमधील बांधकामाच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरून पडून मजूर महिलेचा मृत्यू झाला. सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी ठेकेदारावर हडपसरपोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
अरुणाबाई चौबे (वय ३५, रा. टकलेनगर गोपालकट्टी मांजरी रस्ता, मूळ छत्तीसगड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हुसेन मनुवर शेख (वय ५२, हडपसर) या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांना सेफ्टीबेल व डोक्याला हेल्मेट वगैरे संरक्षण साहित्य न देता तेथील कामगारांकडून धोकादायकरीत्या काम करून घेत होते. बिगारी काम करणाऱ्या महिलेचा अचानक पाय घसरल्याने ती पहिल्या मजल्यावरून खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे पुढील तपास करीत आहेत.