घराच्या अंगणात झोक्यावर; बिबट्या कंपाऊंडमध्ये घुसला, चिमुकल्याची प्रसंगावधान थेट घरातच धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:48 IST2025-11-05T18:05:03+5:302025-11-05T18:48:48+5:30
कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला

घराच्या अंगणात झोक्यावर; बिबट्या कंपाऊंडमध्ये घुसला, चिमुकल्याची प्रसंगावधान थेट घरातच धाव
पुणे : शिरूर तालुक्यात सलग २० दिवसांत झालेल्या तीन बिबट्या हल्ल्यांत दोन लहान मुलांचा आणि एका आजीचा मृत्यू झाला आहे. सध्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना घरातून बाहेर येणेही अवघड झाले आहे. तर मुलांना शाळेत जाण्याची सुद्धा भीती वाटू लागली आहे. संतप्त ग्रामस्थ बिबटयांना थेट ठार मारण्याची मागणी करू लागले आहेत. अशातच पुन्हा एकदा बिबट्याच्या तावडीतून चिमुकला वाचल्याची घटना समोर आली आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच १४ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आणि ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला. बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.