Pune Crime: हडपसर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेल्या चोराला दीड तासात पकडले
By नितीश गोवंडे | Updated: June 22, 2024 18:18 IST2024-06-22T18:17:49+5:302024-06-22T18:18:32+5:30
दीड तासात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने दिवे घाटातून ताब्यात घेत पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केली....

Pune Crime: हडपसर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेल्या चोराला दीड तासात पकडले
पुणे :हडपसरपोलिस ठाण्यात असलेल्या कोठडीतून (लाॅकअप) चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना घडली. गजबजलेल्या परिसरात पोलिस ठाणे असल्याने, हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेकडून लगेचच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात झाली. दीड तासात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने दिवे घाटातून ताब्यात घेत, पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केली.
गोविंद उर्फ पिंट्या घोडके असे पसार झालेल्या चोरट्याचे आहे. हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडके याला अटक करण्यात आली होती. शनिवारी (दि. २२) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घोडकेच्या हाताचे ठसे घेण्यासाठी पोलिस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून घोडके पसार झाला.
पसार झालेल्या घोडकेचा शोध घेण्यासाठी लगेचच नाकाबंदी करण्यात आली. यासह पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरूवात केली. त्याला शोधण्यासाठी हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली. अखेर दीड तासानंतर गुन्हे शाखेने त्याला दिवे घाटातून ताब्यात घेत, पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान आरोपी पळाल्याची माहिती समजताच पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी कसा पसार झाला, याबाबतचे चाैकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.