CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:07 IST2022-08-23T13:07:41+5:302022-08-23T13:07:51+5:30
सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मराठ्यांचा इतिहास अगदीच तोकडा दिला आहे

CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा
पुणे: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळाने शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अवघे पुस्तकच समाविष्ट केलेले असताना सीबीएसई मंडळाने मात्र त्यांच्यावर इयत्ता सातवीच्या पुस्तकात केवळ एक धडा दिला आहे.
महाराष्ट्राचे दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यातील मुलांना शालेय जीवनातच माहिती मिळावी. यासाठी इयत्ता चौथीच्या पुस्तकात पूर्वी इतिहासाच्या विषयात छत्रपती शिवाजी महाजारांचे अवघे पुस्तक समाविष्ट होते. चौथीचा अभ्यासक्रम आणि विषय बदल केले. मात्र परिसर अभ्यास या विषयात या पाठ्यपुस्तकाचा समावेश कायम राहिला. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही हे पुस्तक इंग्रजी भाषेत जसेच्या तसे समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मराठ्यांचा इतिहास अगदीच तोकडा दिला आहे.
सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता सातवीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर एक धडा आहे. तर आयसीएसईमध्येही सहावीच्या पुस्तकात एक धडा आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह संपूर्ण मराठा साम्राज्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याने महाराजांच्या जाज्वल्य पारक्रमाविषयी विद्यार्थ्यांना तोकडी माहिती मिळते. त्यामुळे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होत नाही.
२०१६ मध्ये समावेश
२०१६ च्या आधी छत्रपती शिवाजी महाजारांचा एक शब्दही सीबीएसईच्या कोणत्याच वर्गाच्या पाठ्यपुस्तकात नव्हता. त्याबाबत पालकांमधून मागणी झाल्यानंतर मात्र तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या एनसीईआरटी संस्थेकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर सीबीएसई अभ्यासक्रमात इयत्ता सातवीत मराठा साम्राज्य हा धडा समायोजित करण्यात आला. त्यामध्ये छत्रपतींचा इतिहास थोडक्यात सांगण्यात आला आहे. पुढे हळूहळू हा इतिहात अधिक व्यापक करू, अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी त्यावेळी दिली होती. मात्र नंतर तीन वेळा सरकार बदलले तरी एनसीईआरटीकडून अभ्यासक्रम बदलला नाही.