किरण शिंदे
पुणे : पुणे शहराला हादरवणारी घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आला आहे. हडपसर–सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
३ मार्च रोजी दिवेघाटाच्या पायथ्याशी एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फुरसुंगी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रकाश माने हा एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ज्या परिसरात तो काम करत होता, त्याच परिसरात ही महिला मागील काही दिवसांपासून फिरत होती. ती दिवेघाट परिसरातच रस्त्याच्या कडेला झोपत असे. तेव्हापासून आरोपीची तिच्यावर नजर होती.
रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीने दिवेघाटाच्या पायथ्याशी त्या महिलेला गाठले. त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला विरोध करत आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आपला भांडाफोड होईल या भीतीने आरोपीने संतापाच्या भरात तिच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट सहा चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.
Web Summary : A shocking incident in Pune: A woman was brutally murdered near Dive Ghat for resisting a sexual assault. Police have arrested the supervisor accused of the crime. The victim's identity remains unknown; investigations are ongoing.
Web Summary : पुणे में सनसनीखेज वारदात: यौन उत्पीड़न का विरोध करने पर दिवे घाट के पास एक महिला की बेरहमी से हत्या कर दी गई। पुलिस ने आरोपी सुपरवाइजर को गिरफ्तार कर लिया है। पीड़िता की पहचान अभी तक नहीं हो पाई है; जांच जारी है।