नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार
By अतुल चिंचली | Updated: June 3, 2025 16:00 IST2025-06-03T16:00:09+5:302025-06-03T16:00:31+5:30
नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही, परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्याने इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागले

नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीत शिरला उंदीर; यशवंतराव नाट्यगृहातील खळबळजनक प्रकार
पुणे : पुण्याच्या कोथरूड भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नाटकादरम्यान एका महिलेच्या साडीत उंदीर शिरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नाटक पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या साडीमध्ये उंदीर शिरल्याने एकाच गोंधळ उडाला आहे. जवळपास २० मिनिटे उंदीर महिलेच्या साडीत असल्याची चिंताजनक माहितीही समोर आली आहे. या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून यशवंतरावच्या व्यवस्थापनाच्या देखभाल दुरुस्तीबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ३१ मे रोजी या नाट्यगृहामध्ये 'मूषक' या नाटकाचा प्रयोग सुरू होता. हे नाटक पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या साडीमध्ये अचानक उंदीर शिरला. या घटनेमुळे नाटक सुरू असताना एकच गोंधळ उडाला. नाटकामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्या धावतच प्रेक्षकगृहाबाहेर गेल्या. त्यांच्या पतीने ही अतिशय कठीण परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली. आताच्या प्रेक्षागृहात फारसा गोंधळ झाला नाही. मात्र बाहेर आल्यानंतर उंदराला बाहेर काढण्यासाठी जवळपास २० मिनिटे लागली. नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही. परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्याने इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलेला इंजेक्शन घ्यावे लागले.
ही घटना वृद्ध, लहान मूल किंवा कुठलाही प्रेक्षक कोणासोबतही घडण्याची शक्यता आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत असं घडलं असतं, तर कदाचित त्यांचं आरोग्यही धोक्यात आलं असतं. ही अतिशय गंभीर बाब आहे. यशवंतराव नाट्यमंदिराच्या व्यवस्थापनाने त्वरित याची दखल घेऊन उंदरांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेने यशवंतराव नाट्यगृहाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नाट्यगृह व्यवस्थापनाने याची त्वरित दखल घेऊन उपायोजना कराव्यात अशी मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली आहे. याबाबत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त यांनी आज तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत आहे.