ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं?

By नितीश गोवंडे | Updated: February 27, 2025 20:35 IST2025-02-27T20:32:19+5:302025-02-27T20:35:13+5:30

पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्याला निलंबित करण्यात आले

A police constable was suspended by Vishrantwadi police after he tried to set himself on fire by pouring petrol on himself inside the police station. | ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं?

ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं काय घडलं?

पुणे : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संबंधित पोलिस व त्याच्या सहकाऱ्यांवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत असल्याचे पाहून, आपलीही तक्रार दाखल करून घ्यावी, यासाठी पोलिस अंमलदाराने पोलिस ठाण्यातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झाल्याने मुख्यालयाचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी संबंधित पोलिस अंमलदाराला निलंबित केले आहे. विजय लक्ष्मण जाधव असे या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

विजय जाधव याची पोलिस मुख्यालयातील आर कंपनीमध्ये सध्या नियुक्ती होती. विशेष म्हणजे विश्रांतवाडी पोलिसांनी विजय जाधव याचा भाऊ विकी लक्ष्मण जाधव यांची फिर्याद आधी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी घेतली. त्यात ओमकारसिंग गुलचंदसिंग भोंड, गुरदीपसिंग भोंड, जयदीपसिंग भोंड, गुरुबचन भोंड (सर्व रा. सह्याद्री कॉलनी, आनंद पार्क, धानोरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वराह त्यांच्या जागेत ठेवण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे होऊन मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

त्यानंतर मकारसिंग गुलचंद्रसिंग भोंड (४५, रा. ओमकार निवास, सह्याद्री कॉलनी, आनंद पार्क, धानोरी) यांची फिर्याद २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून ०३ मिनिटांनी दाखल करण्यात आली आहे. त्यात विजय जाधव, विकी जाधव, विजय जाधव यांची बहीण व तिचा पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धानोरीतील सह्याद्री कॉलनी येथे २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता.

ही भांडणे झाल्यानंतर दोन्हीही बाजूचे लोक विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जमले होते. त्यावेळी पोलिसांनी ओंकारसिंग भोंड यांची फिर्याद घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी विजय जाधव हा आपलीही फिर्याद घ्यावी, याचा आग्रह करू लागला. त्याने बाहेर जात गाडीतील पेट्रोल काढून आणले. माझी तक्रार घेतली नाही तर मी इथेच पेटवून घेईन, असे बोलून स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याला जागेवरच रोखले. त्यामुळे पुढील प्रसंग टळला. त्यानंतर विकी जाधव याची अगोदर फिर्याद घेण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या विरोधकांची फिर्याद घेतली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अदखलपात्र गुन्हा विजय जाधव याच्यावर नोंदवण्यात आला असून, त्याचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: A police constable was suspended by Vishrantwadi police after he tried to set himself on fire by pouring petrol on himself inside the police station.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.